बायपासला जोडण्यासाठी महापालिकेचा प्लॅन, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल उभारणार
By मुजीब देवणीकर | Published: January 28, 2023 08:36 PM2023-01-28T20:36:58+5:302023-01-28T20:37:37+5:30
शिवाजीनगर भुयारी मार्गाचा विषय मार्गी लागेना तरी...
औरंगाबाद : बीड बायपासकडे जाण्यासाठी संग्रामनगर हा एकच उड्डाणपूल आहे. बायपासच्या पलीकडे नागरी वसाहतींचा झपाट्याने विकास होतोय. नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची तयारी मनपा प्रशासनाने दर्शविली आहे. पुलासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केली.
बीड बायपासकडे जाण्यासाठी रेल्वेस्टेशन, संग्रामनगर, शिवाजीनगर हे तीन मुख्य रस्ते आहेत. रेल्वेस्टेशन एमआयडीसीमधूनही १०० फुटांचा एक रस्ता बायपासला येऊन मिळताे. मात्र, एमआयडीसी भागात रेल्वे रूळ गेल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. या ठिकाणी एक उड्डाणपूल उभारला तर देवगिरी महाविद्यालयापासून नागरिकांना थेट बायपासला सहजपणे येता येईल. विशेष बाब म्हणजे दोन्ही बाजूने गुळगुळीत रस्ताही केला आहे. फक्त रेल्वे रुळावरून पूल बांधल्यास नागरिकांना जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी दोन्ही बाजूंनी उंच टेकड्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात याठिकाणी पूल होऊ शकतो, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अलीकडेच जागेची पाहणी केली. शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपअभियंता संजय कोंबडे यांची यावेळी उपस्थिती होती. यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याचे आदेश डॉ. चौधरी यांनी दिले.
भुयारी मार्ग केव्हा करणार?
शिवाजीनगर येथील रेल्वेचा भुयारी मार्ग रखडल्याने सध्या नागरिकांना रेल्वेस्टेशन व संग्रामनगर हे दोनच उड्डाणपूल उपलब्ध आहेत. संग्रामनगर उड्डाणपुलालगत असलेल्या मैदानावर मोठा कार्यक्रम असल्यास रेल्वेस्टेशन उड्डाणपूल व शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांच्या रांगा लागतात. त्यात वाहनधारक अडकून पडतात. त्यामुळे रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात नवा उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. मनपाने शिवाजीनगर भूसंपादनाचा मार्ग माेकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.