महापालिकेचे पथक पुन्हा सरसावले, पीर बाजारातील अनधिकृत नळांचे जाळे कापले
By मुजीब देवणीकर | Published: September 13, 2022 01:37 PM2022-09-13T13:37:54+5:302022-09-13T13:45:41+5:30
३ हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे.
औरंगाबाद: खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत नळ कापण्यासाठी तीन स्वतंत्र पथक नेमले आहेत. यातील एका पथकाने आज सकाळी पीर बाजार परिसरातील कामगार चौक येथे अनधिकृत नळ कापण्याची मोहीम सुरू केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ सापडले. हे नळ पथकाने कापले आहेत.
शहराचा पाणीप्रश्न मागील अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. मुबलक पाणीसाठी असूनही शहराला नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. यासोबतच शहरातील सर्वच वसाहतीत अनधिकृत नळ आढळून आली आहेत. दरम्यान, शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत खंडपीठाने कडक भूमिका घेत महापालिकेला कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार महापालिकेने तीन पथके स्थापन करून अनधिकृत नळ जोडणीवर कारवाई सुरु केली आहे. शहरात दीड लाखाहून अधिक अनधिकृत नळ असावेत असा महापालिकेचा प्राथमिक अंदाज आहे. ३ हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे. मात्र या मोहिमेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. महापालिका पथकाने विविध वसाहतीत अनधिकृत नळ जोडण्या शोधून कापण्याची मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत हजारो नळ जोडण्या पथकाने कापल्या आहेत.