गॅरेजच्या सुरक्षारक्षकाला दगडाने ठेचले; खुनाचे रहस्य २४ तासांत उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:48 PM2024-07-10T12:48:55+5:302024-07-10T12:49:12+5:30
सुरक्षा करत असलेल्या गॅरेज समोरच सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचलेला, रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला होता
- मेहमुद शेख
वाळूज महानगर : बजाज गेट समोरील गॅरेजवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या भाऊसाहेब पडूळकर यांचा रविवारी रात्री दगडाने ठेचून खून झाला होता. या खुनाचे रहस्य उलगडण्यात गुन्हे शाखेला यश आले. गॅरेज समोरून हाकलल्याने भाऊसाहेबांचा खून करणाऱ्या नागराज उर्फ नाग्या माधव गुंडीले (२७, रा.गल्ले बोरगाव, ह.मु. पंढरपूर) यास अवघ्या २४ तासांत गुन्हे शाखेने त्याच्या मूळ गावी जेरबंद केले.
भाऊसाहेब बजाज कंपनीसमोर असलेल्या गॅरेजमध्ये वॉचमन होते. सोमवारी सकाळी त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सातारा पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्याचा शोध सुरू केला. यातील आरोपी खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळाली. ही माहिती मिळताच पथकाने मंगळवारी तेथे छापा मारून नागराजला जेरबंद केले.
पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. घटनेच्या रात्री तो गॅरेजवर गेला असता त्यास भाऊसाहेब यांनी हाकलून दिल्याने त्याने रागाच्या भरात भाऊसाहेबांचे डोके भिंतीवर दोनदा आपटले. ते खाली पडताच दगडाने त्यांचा खून करून पसार झाल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. गुरमे, उपनिरीक्षक संदीप साळुंके, पोहेकाॅ प्रकाश गायकवाड, बाळू लहरे, अमोल शिंदे, सुनील बेलकर, नवनाथ खांडेकर, शाम आढे, विजय घुगे, तात्याराव शिनगारे आदींनी ही कामगिरी फत्ते केली.