विद्यापीठ नामांतराच्या नावगुणानं चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं

By विजय सरवदे | Published: January 14, 2023 08:01 PM2023-01-14T20:01:01+5:302023-01-14T20:01:41+5:30

नामांतराच्या नावगुणानं आपला चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं व तेही हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाच्या विद्यापीठाच्या रूपात.

The name change of the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's proved a miracle and Nandedkar got an independent university | विद्यापीठ नामांतराच्या नावगुणानं चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं

विद्यापीठ नामांतराच्या नावगुणानं चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं

googlenewsNext

नामांतर लढ्याला प्रेरणादायी इतिहास आहे. दलित पँथरसह अनेक पुरोगामी संघटना आणि कार्यकर्ते हा लढा नेटाने रेटून नेत होते. दुसऱ्या बाजूने विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून नामांतराला कडाडून विरोध करीत होते. या लढ्यात मराठवाड्यातील दलितांची हजारो घरे बेचिराख झाली, अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यांचे स्मरण आणि तब्बल १७ वर्षे चाललेल्या या लढ्याचा विजयोत्सव म्हणून दरवर्षी दि. १४ जानेवारीला विद्यापीठ नामविस्तार वर्धापन उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मान्यवरांच्या काही आठवणी...

विद्यापीठ नामांतर लढ्याचा पायगुण
डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, नामांतर लढा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची नि अनुभवण्याची संधी मला १९७८ ते १९९४ दरम्यान मला मिळाली. याविषयावर व इतिहासावर संशोधनपर ग्रंथ लिहिण्याचं कार्यही मला करता आलं. नामांतराची बाजू आग्रहपूर्वक मांडणारा मी लेखक-पत्रकार होतो. सामाजिक न्याय नि समता चळवळीचा मी एक कडवा समर्थक होतो नि आजही आहे. ‘नामांतर लढा: एक शोधयात्रा’ या पुस्तकाच्या लेखनासाठी मी महिनाभर अत्याचारग्रस्त गावात जाऊन रिपोर्टाज लिहिले. मी अवघा वीस-बावीस वर्षांचा होतो. जातीपाती पलीकडे जाऊन सत्यदर्शी पत्रकारिता लेखन मी करू शकलो. दलितांची घरे जाळली गेली, कुणाची हत्या झाली, दलितद्वेषाची लाट निर्माण झाली, दलित व सवर्ण संघर्ष विकोपाला पोहोचला होता. बहुजनांमध्ये आपसात लढाई लावली गेली. वर्तमानपत्र माध्यमांची उपयोग भल्याभल्या पत्रकार नि संपादकांनी आगीत आपल्या शब्दांनी तेल ओतायचं काम केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांड पंडिताचा अभिमान वाटायच्या ऐवजी द्वेषमूलकतेचं ते माध्यम केलं गेलं. उच्चवर्णीय स्वातंत्र्य सैनिकांनी तर आत्मदहनाची जाहीर धमकी दिली. विद्यापीठाचं नामांतर झाल्यास या विद्यापीठात बुद्धवंदना म्हणावी लागेल, पदवीवर डॉ. आंबेडकर व तथागत गौतम बुद्धाचे फोटो छापले जातील, सवर्ण समाजाची मुलं या विद्यापीठातून प्रवेश घेणार नाहीत व घेतला तर प्रवेश रद्द करतील, अशा वदंता जाणीवपूर्वक छापल्या व पसरविल्या गेल्या. नामांतरीत विद्यापीठाचं गेट रात्रीतून उडविलं जाऊन जमीनदोस्त केलं जाईल, अशा अफवाही पसरविल्या गेल्या. 

दलित नि सवर्ण या दोन समाजांत विषारी वातावरण केलं गेलं. परंतु , गेल्या तीन दशकांत यापैकी काहीही घडलं नाही. दोन्ही समाजांनी समंजसपणा व शहाणपणा दाखविला नि असं काही घडलं नाही. मराठवाडा प्रदेशाच्या अस्मितेचा बाऊ केला गेला, जणू डॉ. आंबेडकर यांचं नाव दिल्यानं मराठवाडा प्रदेशाची अस्मिता चुरडली जाणार होती. खरे तर आग लावणारे हा विषय धगधगत ठेवू इच्छित होते. पण, अशावेळी समाजाचं शहाणपण उच्च पातळीचंच राहिलं. असत्याला पाय नि चेहरा नसतो हेच या आगलावी वृत्तीच्या व्यक्तींना समजायला लागलं नि नवं काही असं घडलं तर समाज शास्वत राहिलेला आपण पाहिलं आहे. नामांतराच्या नावगुणानं आपला चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं व तेही हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाच्या विद्यापीठाच्या रूपात. मराठवाडा प्रदेशातील हे नवं विद्यापीठ स्वामीजींचं मोठं स्मारक ठरलं. हा नामांतराचा पायगुणच होता हे कसं नाकारता येईल?

Web Title: The name change of the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's proved a miracle and Nandedkar got an independent university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.