औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:32 PM2022-05-05T14:32:21+5:302022-05-05T14:33:16+5:30

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल

The name of Aurangabad is in the world, take off of planes for just three cities | औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
वेरुळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे औरंगाबाद शहराचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. मात्र, औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तीन शहरांच्या पलीकडे विमानसेवा झेप घेत नसल्याची परिस्थिती आहे. नवीन विमान कंपनीही सध्या सुरू असलेल्या शहरांसाठीच विमानसेवा सुरू करीत आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षाच औरंगाबादकर करीत आहेत.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये दिल्ली, मुंबईसाठी रोज प्रत्येकी दोन विमानांचे उड्डाण होत आहे. आता फ्लायबिग एअरलाईन्स १५ मे पासून हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद विमानसेवा सुरू करणार आहे. ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. या तीन शहरांशिवाय इतर शहरांसाठी विमानसेवा कधी सुरू होणार, असा सवाल आहे. नव्या शहरांसाठी औरंगाबादहून किती प्रवासी, प्रतिसाद मिळेल, याबाबत विमान कंपन्यांना प्रश्न पडत आहे. टूर ऑपरेटरच्या पर्यटन परिषदा झाल्यास औरंगाबादचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. तसे झाल्यास औरंगाबादचे पर्यटन क्षेत्र व्यापक होऊ शकेल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

या शहरांसाठी विमानसेवेची प्रतीक्षा ?
अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसह पुणे, नागपूर, इंदोर, गोवा, भोपाळ, बोधगया या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, अशी उद्योजक, व्यापारी, पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. कोरोनापूर्वी अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होती. परंतु, कोरोना विळख्यात बंद पडलेली ही कनेक्टिव्हिटी अजूनही पूर्ववत झालेली नाही.

उडान योजनेत समावेश व्हावा
एकाच शहरासाठी औरंगाबादहून रोज एकापेक्षा जास्त विमानसेवा असल्याने तिकिटांचे दर सध्या नियंत्रणात आहेत, ही चांगली बाब आहे. औरंगाबाद हे केंद्र सरकारच्या उडान योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना येथून नव्या सेवा देण्यास जास्त रस नाही.
- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

विमानसेवा वाढीसाठी पाठपुरावा
बंगळुरू आणि अहमदाबादला विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी फ्लायबिग आणि एअर इंडियाकडे करण्यात आली आहे. या शहरांना प्रारंभी आठवड्यातून काही दिवसही चालविता येईल. पुणे, उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू आहेत. उदयपूरची विमानसेवा हिवाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. आकासा एअरलाइन्सच्या विमानसेवेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी

Web Title: The name of Aurangabad is in the world, take off of planes for just three cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.