मातब्बर विरोधकांचे जाळे भेदले, मासेमारी करणारे रामचंद्र मोरे खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:49 PM2022-12-21T13:49:07+5:302022-12-21T13:50:02+5:30
आवलगाव हमरापुर ग्रामपंचायतच्या खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी रामचंद्र मोरे यांचा विजय
- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर ( औरंगाबाद) : तालुक्यातील आवलगाव हमरापुर ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. सर्व मातब्बर मंडळीच्या विरोधात मासेमारी करणारे कुटुंब असा सामना येथे रंगल्याने तालुक्याचे लक्ष या लढतीकडे होते. यामध्ये मासेमारी करणारे रामचंद्र मोरे गावचे सरपंचपदी विराजमान झाल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
वैजापूर तालुक्यातील आवलगाव हमरापुर या ग्रुप ग्राम पंचायतीची निवडणूक चांगलीच रंगत वाढवणारी ठरली. हमरापुर येथील मोरे कुटुंब पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातूनच त्यांनी आपल्या कुटुंबाला उच्चशिक्षित केले. रामचंद्र मोरे यांच्या मुलगा देशसेवेमध्ये कार्यरत आहे. एक पुतण्या डॉक्टर, दुसरे पीएसआय झालेले आहेत. मागील पंच वार्षिक निवडणुकीत मोरे यांच्या सुनबाई नंदाबाई संजय मोरे ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या. त्यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे झाली.
या पंचवार्षिकसाठी सरपंच पद खुलाप्रवर्गसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मात्र, मासेमारी करता करता गावची विकासाची नाळ मोरे कुटुंबाकडे असल्याचा त्यांना फायदा झाला. त्यामुळेच खुल्याजागेत मातब्बरांच्या विरोधात रामचंद्र मोरे हे सरपंच पदासाठी निवडणुकीत उभे राहिले. प्रचारा दरम्यान यंदा जोरदार लढत पाहायला मिळेल याचा अंदाज सर्वांनाच आला. दोन्ही गावातील मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत निवडून दिले. मोरे यांना ४६५ मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील सोमनाथ पाटील यांना ३६४ मते मिळाली. मासेमारी करणारा गावचा कारभारी बनल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, आमचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय सुरु राहील. यासोबतच गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच मोरे यांनी विजयानंतर सांगितले.