छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वाकडे, १०० कोटींवर खर्च
By विजय सरवदे | Published: May 23, 2024 07:13 PM2024-05-23T19:13:20+5:302024-05-23T19:14:19+5:30
येत्या दोन महिन्यांत (जुलैमध्ये) विखुरलेली सर्व कार्यालये एकाच छताखाली कार्यान्वित करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या पर्यावरणपूरक (ग्रीन बिल्डिंग) चार मजली प्रशासकीय इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत (जुलैमध्ये) विखुरलेली सर्व कार्यालये एकाच छताखाली कार्यान्वित करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना व्यक्त केला. दरम्यान, कंत्राटदार कंपनीने त्यादृष्टीने खिडक्या, दरवाजे, टाईल्स, विद्युतीकरणाच्या कामाला गती दिली आहे. विशेष म्हणजे, ही इमारत पूर्णत्वास येईपर्यंत सुमारे शंभर कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
जिल्हा परिषदेची औरंगपुरा परिसरातील प्रशासकीय इमारत ही निजामकालीन वास्तूमध्ये होती. ही वास्तू जीर्ण झाल्यामुळे सन २००१ पासून नवीन इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या इमारतीचा कोनशिला समारंभही झाला होता; पण कधी निधीच्या, तर कधी जागेच्या भोवऱ्यात अडकलेल्या इमारत उभारणीच्या कामाला मुहूर्तच लागला नव्हता. अखेर दोन दशकानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले. आता २ वर्षे ८ महिने होत आले आहेत. या इमारतीसाठी सुरुवातीला ३७ कोटी व नंतर सुधारित ४७ कोटींचा निधी मिळाला. त्यातून प्लास्टर, एलिव्हेशन ट्रीटमेंट, परिसर सौंदर्यीकरण, आपत्कालीन अतिरिक्त जिना, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम केले जात आहे. आता फर्निचर, अग्निशामक व अग्निरोधक यंत्रणा व अन्य कामांसाठी आणखी १० कोटी रुपयांच्या सुधारित निधीची मागणी करण्यात आली आहे. शासनाने प्रशासकीय मंजुरीही दिली आहे. आचारसंहिता शिथिल होताच हा निधीही प्राप्त होईल.
अशी असेल कार्यालयांची रचना
- तळमजल्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार विषय समित्यांचे सभापती, प्राथमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम, समाजकल्याण, पेन्शन सेल आदी दालने, शिक्षण विभागाचे स्टोअर रुम.
- पहिल्या मजल्यावर वित्त, सिंचन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाणीपुरवठा आणि माध्यमिक शिक्षण विभाग.
- दुसऱ्या मजल्यावर मुख्य कार्यकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन, सामान्य प्रशासन विभाग, व्हिडीओ काॅन्फरन्सिंग हॉल, पंचायत विभाग, महिला व बालविकास विभाग, सेंट्रल रेकॉर्ड रुम, सेमिनार हॉल.
- तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ भारत मिशन, पशुसंवर्धन, कृषि, व्हीआयपी रुम, सर्वसाधारण सभेसाठी सभागृह, ग्रंथालय, एनएचआरएमचे कार्यालय असेल.