डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी!

By संतोष हिरेमठ | Updated: February 28, 2025 17:45 IST2025-02-28T17:39:34+5:302025-02-28T17:45:01+5:30

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: रुग्णालयांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढतोय वापर

The new companion of doctors, the 'AI' of diagnosis and treatment works heavily! | डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी!

डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी!

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही कल्पना करा, तुम्ही डॉक्टरकडे जातात आणि तुमच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर क्षणार्धात तुमच्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, आहाराचा चार्ट आणि व्यायामाचा प्लॅन मिळतो. होय, हे आता शक्य आहे, कारण रुग्णालयांमध्ये आता ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, डायट चार्ट, एक्सरसाइज प्लॅन तयार करण्यापासून ते निदान आणि उपचारांसाठीदेखील ‘एआय’चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. विज्ञान आणि आरोग्य यांचा संगम असलेल्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी होऊ लागला आहे. ‘एआय’मुळे प्रारंभी आरोग्य क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली; परंतु आता आरोग्य क्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढत आहे.

एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅनसारख्या तपासण्यांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी ‘एआय’चा वापर होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक असे ‘एक्स-रे विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही मशीन दाखल झाली आहे. एक्स-रे काढल्यानंतर अवघ्या काही क्षणांत, अगदी डाॅक्टरांच्याही आधी रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे निदान ‘एआय’ करीत आहे.

फंडोस्कोपी अन् ‘एआय’...
फंडोस्कोपी ही एक महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्याद्वारे डोळ्याच्या आतील भागाचा, विशेषतः रेटिनाचा अभ्यास केला जातो. आता एआयचा उपयोग ‘फंडोस्कोपी’मध्ये होत आहे. एआय-आधारित सॉफ्टवेअर रेटिनातील अगदी लहानशा बदलांचे अचूक विश्लेषण करून डायबेटिक रेटिनोपथी, ग्लॉकोमा आणि मॅक्युलर डीजेनेरेशनसारख्या आजारांचे लवकर निदान करण्यात मदत करत आहे. स्मार्ट अल्गोरिदमच्या मदतीने ‘एआय’ डिजिटल प्रिस्क्रिप्शन करून देत आहे. त्याचबरोबर रुग्णाचे डायट आणि फिटनेस चार्ट तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरत आहे. रोबोटिक यंत्रातही ‘एआय’चा वापर होत आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हृदयरोग, मधुमेहाचा धोकाही सांगेल
शहरात आता रुग्णालयांत ‘एआय’चा अनेक उपचारासाठी वापर होऊ लागला आहे. आगामी काही वर्षात आरोग्य तपासणीनंतर एखाद्या व्यक्तीला पुढे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका येण्याचा, मधुमेहाचा धोका आहे का, हेही ‘एआय’ सांगू शकणार आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे एकप्रकारे ‘एआय’चा प्रकार आहे.
- डॉ. अजय रोटे, मधुमेहतज्ज्ञ व ‘अमेरिकन बोर्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मेडिसिन’ प्रमाणपत्रधाकरतज्ज्ञ

Web Title: The new companion of doctors, the 'AI' of diagnosis and treatment works heavily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.