नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा
By राम शिनगारे | Published: November 18, 2023 04:52 PM2023-11-18T16:52:09+5:302023-11-18T16:52:58+5:30
शिक्षण संस्था सक्षम होतील, विद्यापीठांवरील ताण कमी होईल; उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर
छत्रपती संभाजीनगर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० नुसार राज्यात समूह विद्यापीठे स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने अनेक महाविद्यालयांना एकत्र येऊन समूह विद्यापीठ (क्लस्टर) स्थापन करता येतील. त्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे शिक्षण संस्था सक्षम होतील. पारंपरिक विद्यापीठांवर संलग्न महाविद्यालयांचा असलेला ताणही कमी होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी 'लोकमत'शी साधलेल्या संवादात दिली.
राज्याच्या मंत्रिमंडळाने क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली. वेगवेगळी महाविद्यालये, संस्था एकत्र येऊन क्लस्टर विद्यापीठ स्थापन करणार असतील तर त्यांना ५ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच क्लस्टर विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या संवैधानिक पदांना मान्यता व खर्चाला मंजुरी मंत्रिमंडळाने दिली. याविषयी डॉ. देवळाणकर यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
प्रश्न : क्लस्टर विद्यापीठ ही संकल्पना राज्यात लागू करण्यात आली आहे का?
उत्तर : हाेय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी मिळाली आहे. राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी केली आहे. त्या धोरणातच क्लस्टर विद्यापीठाविषयी धोरण स्पष्ट केलेले आहे. या धोरणानुसार प्रत्येक शिक्षण संस्था सक्षम झाली पाहिजे. त्या संस्थांनी पदवीचे वाटप करावे. त्यामुळे पारंपरिक विद्यापीठांवर संलग्न महाविद्यालयांमुळे प्रशासकीय व शैक्षणिक कामाचा पडलेला प्रचंड ताण कमी होण्यास मदत होईल. या निर्णयाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळणार आहे. कारण समाजसुधारकांनी मोठ-मोठ्या शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख आदींचा समावेश आहे. या मोठ्या शिक्षण संस्था क्लस्टर विद्यापीठे स्थापन करतील.
प्रश्न : क्लस्टर विद्यापीठांना सीमारेषा असणार आहे का?
उत्तर : क्लस्टर विद्यापीठांना नक्कीच सीमारेषा असणार आहे. त्याविषयीचा अधिकृत शासन निर्णय निघेल. त्यानंतर सीमारेषांविषयी स्पष्टता येईल.
प्रश्न : क्लस्टर विद्यापीठ झाल्यास संबंधित महाविद्यालयांना अनुदान मिळेल का?
उत्तर : नक्कीच मिळणार. क्लस्टर विद्यापीठ केल्यास संबंधित महाविद्यालयांच्या अनुदानावर कोणताही परिणाम होणार नाही. शासनाकडून त्यांना नियमानुसार अनुदान कायम मिळणार आहे. हे विद्यापीठ म्हणजे खासगी विद्यापीठ नव्हे. त्यामुळे अनुदानावर कोणताही परिणाम होणार नाही.
प्रश्न : क्लस्टर विद्यापीठाचा राज्याला काय फायदा होईल?
उत्तर : पारंपरिक विद्यापीठांवर असलेला ताण कमी होईल. ज्या भागात क्लस्टर विद्यापीठ होईल. त्या संस्थांना स्थानिक रोजगारासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम तयार करता येतील. त्याविषयीच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळेल. क्लस्टर विद्यापीठांना स्वतंत्र अभ्यास मंडळे, व्यवस्थापन परिषद असेल. त्यात तत्काळ निर्णय होतील. उच्च शिक्षणात गतिमानता येईल.