"निजाम गेले, मेले, संपले"; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 08:40 AM2024-03-06T08:40:46+5:302024-03-06T08:53:31+5:30
उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे.
छ. संभाजीनगर/मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत गृहमंत्री अमित शाह यांच्या सहीनेच औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर भाषण करताना अमित शाह यांनी काँग्रेस, ठाकरे, पवार यांच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. तर, छ. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना थेट निजामाची उपमा दिली. एमआयएमला उखडून टाका, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी संभाजीनगरवासीयांना केले. आता, अमित शाह यांच्या टीकेवर पलटवार करताना जलील यांनी सध्याच्या काळात निजामाचं काम कोणता पक्ष करतोय, असे म्हणत भाजपाला टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी भाच्याचे, तर स्टॅलिन मुलाचे भवितव्य शोधण्यात व्यस्त आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष ‘लोकशाही’ नव्हे तर ‘घराणेशाही’ जपण्यात ‘मस्त’ आहेत. तर, नरेंद्र मोदी विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहेत, असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी, तेथील खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमवरही बोचरी टीका केली.
आज या सभेतून आपण संकल्प केला पाहिजे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर निजामापासून मुक्ती दिली होती. आता, नव्या निजामांना पुन्हा घरी बसवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करू, असे म्हणत अमित शाह यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. अमित शाह यांच्या टीकेला खा. जलील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन असं धमकी देणारं विधान करणं त्यांना शोभतं की नाही हे मला माहिती नाही. ते माझा संबंध निजामाशी जोडत आहेत, माझा काही संबंध नाही, निजाम होते एका काळात, ते गेले, मेले,संपले आता. जे काम निजाम करत होते, देशाला तोडण्याचं काम, फोडण्याचं काम करत होते. आज दुर्दैवाने कोणता पक्ष ते काम करत आहे, अमित शाह साहेब मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, असे म्हणत खासदार जलील यांच्या गृहमंत्र्यांवर पलटवार केला आहे.
विकासाचा बायोडाटा पाहूनच करा मतदान
- देशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगून, शाह यांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करीत, तरुणाईला भावनिक साद घातली.
- आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी आहे. त्यामुळे तरुणाईने ताकदीने पुढे येऊन, प्रत्येकाने केलेल्या विकासाचा ‘बायोडाटा’ पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.