‘एनआयसीयू’त दाखल तान्हुल्यांची संख्या वाढतेय; ३ हजार तान्हुले पुन्हा आईच्या कुशीत
By संतोष हिरेमठ | Updated: March 11, 2024 12:24 IST2024-03-11T12:23:51+5:302024-03-11T12:24:18+5:30
आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तरच सुदृढ बाळ; ७ वर्षांत ‘एनआयसीयू’त दाखल होणाऱ्या तान्हुल्यांमध्ये एक हजाराने वाढ

‘एनआयसीयू’त दाखल तान्हुल्यांची संख्या वाढतेय; ३ हजार तान्हुले पुन्हा आईच्या कुशीत
छत्रपती संभाजीनगर : जन्मानंतर आईच्या कुशीत जाण्याऐवजी दररोज अनेक तान्हुले ‘एनआयसीयू’त दाखल होत आहेत. सर्वसामान्यांच्या भाषेत काचेच्या पेटीत. मात्र, वर्षभरात सुमारे ३ हजार शिशूंना पुन्हा आईच्या कुशीत सुरक्षितपणे पाठविण्याची किमया घाटीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागाने केली. गेल्या ७ वर्षात ‘एनआयसीयू’त दाखल होणाऱ्या तान्हुल्यांमध्ये एक हजाराने वाढ झाली आहे.
घाटीतील प्रसूतिशास्त्र विभागात दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. त्यातील दररोज १०-१२ नवजात शिशू हे नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल होतात. यामध्ये ६० टक्के बालके ही कमी वजनाची आणि अपूर्वकालीन प्रसूतीत जन्मलेली असतात. ४२ खाटांच्या या विभागात एकावेळी ६० ते ७० अत्यवस्थ नवजात शिशू उपचार घेत असतात. गेल्या वर्षभरात तब्बल ३ हजार २३३ शिशूंना ‘एनआयसीयू’त दाखल करावे लागले. दुर्दैवाने २१० शिशू दगावले.
‘एनआयसीयू’त का होतात दाखल?
प्रामुख्याने अपूर्वकालीन प्रसूती, कमी वजनाची बालके, जन्मतः न रडणारे शिशू, जन्मतः बाह्य किंवा अंतर्गत अवयवांचे व्यंग असणाऱ्या शिशूंचा समावेश असतो. रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, दमा, हृदयाचे आजार, थॅलेसेमिया आजार असलेल्या स्त्रियांनी मातृत्व स्वीकारण्याआधीच या आजाराचा धोका लक्षात घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग, प्राणायाम व पुरेशी झोप घेतल्यास मानसिक स्वास्थ्यही चांगले राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले.
घाटीतील २०१६ ची स्थिती
एकूण प्रसूती - १६ हजार २८८
‘एनआयसीयू’त दाखल शिशू- २ हजार १५५
घाटीतील २०२३ ची स्थिती
एकूण प्रसूती - १९ हजार ४५१
‘एनआयसीयू’त दाखल शिशू- ३ हजार २३३
आहाराकडे द्या लक्ष
लहानपणापासूनच मुलींच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. गरोदरपणात डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आयर्न, कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या. गरोदर मातांनी कोणत्याही गोष्टीचे ‘टेन्शन’ घेऊ नये. वेगवेगळ्या प्रदूषणांचाही गर्भातील बाळावर परिणाम होतो.
- डाॅ. एल. एस. देशमुख, नवजात शिशू अतिदक्षता विभागप्रमुख, घाटी
गर्भधारणेपूर्वीपासून घ्या काळजी
सुरक्षित मातृत्वासाठी महिलेचे वय हे किमान २० वर्षे असावे. गर्भधारणा होण्यापूर्वी तीन महिने आधीपासून फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचे सेवन करावे. गरोदर मातेला पौष्टिक, समतोल प्रोटीन व जीवनसत्त्वयुक्त आहार देणे बाळाच्या वाढीसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
- डाॅ. घनश्याम मगर, स्त्रीरोग, वंध्यत्वतज्ज्ञ व लॅप्रोस्कोपी सर्जन