जुना वाद उफाळून आला; टोळक्याच्या चाकूहल्ल्यात तरुणाचा मृत्यू
By राम शिनगारे | Published: February 5, 2024 11:43 AM2024-02-05T11:43:46+5:302024-02-05T11:55:28+5:30
भावसिंगपुऱ्यात तरुणाचा खून; छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून टोळक्याने तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी भावसिंगपुरा भागात घडली. याप्रकरणी छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका तर वाळूज पोलिसांनी तीन संशयितास ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजेच्या सुमारास खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
शेख आमेर शेख सलीम (२९, रा. जुना भावसिंगपुरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शेख आमेर याच्याविरोधात दारू विक्री, हाणामारीसह खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याचा जुन्या मित्रासोबत वाद होता. या वादातून मित्रांच्या टोळक्याने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आमेरला भावसिंगपुऱ्यात गाठले. त्याच्यासोबत जुन्या वादातून हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला.
हे समजताच पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक प्रमोद देवकते, गणेश केदार यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आमेरला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच आमेरचा मृत्यू झाला. दरम्यान, छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
तीन आरोपींना पकडले
यातील तीन आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पकडले आहे. त्यात रोहित नागेश मोठे (२५), ईश्वर राजेश चव्हाण (२३) आणि सचिन सर्जेराव त्रिभुवन (२३, तिघेही रा. भावसिंगपुरा) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक पांडुरंग डाके, अंमलदार गणेश सगरे, रोहित चिंडले यांच्या पथकाने केली.