तुडूंब भरलेल्या विहिरीचा अंदाज आला नाही; मध्यप्रदेशची मजूर महिला ३ वर्षाच्या मुलासह बुडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 08:07 PM2022-09-28T20:07:52+5:302022-09-28T20:08:03+5:30
शेतातील विहीर ही पाण्याने तुडुंब भरलेली आहे. याशिवाय विहीरीला कठडे नाहीत.
वैजापूर (औरंगाबाद): विहिरीत पडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील शिवराई येथे आज दुपारी घडली. संगीता रवींद्र सोलंकी (१९) व रणजीत रवींद्र सोलंकी (३, रा. बोरली तालुका सेंधवा जिल्हा बडवणी, मध्य प्रदेश) असे या घटनेतील मृत मायलेकांची नावे आहेत.
अशोक बाळासाहेब डिके यांची शिवराई शिवारात गट नंबर ३४४ मध्ये शेती आहे. या शेतात त्यांनी बाहेर राज्यातील मजूरांना कामासाठी बोलावले होते. त्यांच्या शेतातील विहीर ही पाण्याने तुडुंब भरलेली आहे. याशिवाय विहीरीला कठडे नाहीत. जमिनीबरोबर पाणी असल्याने अंदाज न आल्याने ही महिला पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संगीता व तिचा मुलगा यांचा या विहीरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नागरीकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दोघांचेही मृतदेह वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवालदार किसन गवळी यांनी पंचनामा केला असुन वैजापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.