विठुनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमली, लाखो भाविकांनी घेतले दर्शन; भर पावसात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधान...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:21 PM2022-07-10T16:21:56+5:302022-07-10T16:22:49+5:30

अवघी पैठण नगरी विठुनामाच्या गजराने  दुमदुमून निघाली. वैष्णवांच्या गर्दिने पैठण शहर व गोदेचा काठ आज गजबजून गेला, बघावे तिकडे हरिनामाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. 

The Paithan city is full of devotees and chanting of lord Vitthal on ashadhi ekadashi | विठुनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमली, लाखो भाविकांनी घेतले दर्शन; भर पावसात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधान...

विठुनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमली, लाखो भाविकांनी घेतले दर्शन; भर पावसात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधान...

googlenewsNext

पैठण. आता कोठे धावे मन,  तुझे चरण देखिले आज ||  भाग गेला शीण गेला,  अवघा झाला आनंद ।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचिती रविवारी नाथनगरीत ठायीठायी येत होती. आषाढी एकादशीच्या पर्वावर देहभान विसरून ओलेचिंब झालेल्या वारकऱ्यांनी  मोठ्या श्रध्देने नाथांच्या समाधीवर डोके ठेवून दर्शन घेतले.

मंदिरातील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील तृप्त भाव वातावरणातील चैतन्य व वारकरी संप्रदायाची थोरवी अधोरेखित करून जात होता. कोरोना महामारीत सलग दोन वर्ष मंदिराची दरवाजे बंद असल्याने व्यथित झालेल्या वारकऱ्यांनी यंदा मात्र आषाढी वारीला विक्रमी गर्दी केल्याचे दिसून आले. अवघी पैठण नगरी विठुनामाच्या गजराने  दुमदुमून निघाली. वैष्णवांच्या गर्दिने पैठण शहर व गोदेचा काठ आज गजबजून गेला, बघावे तिकडे हरिनामाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. दिवसभरात तीन लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले रात्री उशिरापर्यंत मंदीरा बाहेर दर्शनाची रांग कायम असल्याचे दिसून आले.

आषाढी एकादशीला जे वारकरी भाविक पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाही वा पंढरपूरला जे जाऊ शकले नाही, असे वारकरी पैठण येथे येउन गोदावरीचे स्नान करून नाथांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतात. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असून यंदाही परंपरा कायम राखत लाखो भाविकांनी पैठण येथे हजेरी लावली. दिवसभरात दोन लाखापेक्षा जास्त भाविकांनी नाथ मंदिरात दर्शन घेतल्याचे नाथ संस्थान चे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांनी सांगितले. रात्री उशिरा पर्यंत दर्शनासाठी महिला व पुरूषांच्या रांगा मंदिरा बाहेर लागलेल्या होत्या. दर्शनासाठी तब्बल चार ते पाच तासाचा अवधी लागत होता.तहान भूक हरपून दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा उत्साह भर पावसात दिवसभर टिकून होता.

हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत  वारकरी पायी वाटचाल करत पैठण नगरीत दाखल होत होते. भजन गात, गर्जत, नाचत पैठण मधे आलेल्या वारकऱ्यांच्या दिंडया म्हणजे चैतन्याचा प्रवाह....या दिंडयांचे र्दशनही चित्त प्रसन्न करणारे असेच होते.  रविवारी पहाटे ३ वाजेपासून  पैठण शहरात वारकरी व भाविकांचे आगमन सुरू झाले गळ्यात तुळशीच्या माळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, डोळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची आस, सोबत भानुदास एकनाथाचा जय घोष करत महिला वारकऱ्यांनी मोठ्या संखेने हजेरी लावली. टाळमृदंगाच्या गजरात हातात भगवा ध्वज घेऊन, माथ्यावर गोपीचंदनाचा टिळा लावलेले वारकरी मोठ्या जल्लोषात विठुरायाचा जयघोष करत होते. रात्रभर किर्तन..... अबीर गुलाल उधळीत रंग,  नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.....

पैठण येथे आलेल्या वारकऱ्यांनी रात्री शहरातील विविध मठात व मंदिरात मुक्काम केला. दर्शन व खरेदी झाल्यानंतर रात्री मठात किर्तन व प्रवचन केले मठा मंदिरातून हरिनामाचा गजर मध्यरात्री पर्यंत सुरू होता. नामाच्या या गजराने पैठण नगरीत मंगलमय वातावरण झाले होते. रविवारी आतिल व बाहेरील नाथमंदीरात भाविकांना दर्शन सुरळीत घेता यावे म्हणून नाथसंस्थान व पोलिसांकडुन विशेष नियोजन करण्यात आले होते.   पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे,  फौजदार सतिष भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली आतील व बाहेरील नाथमंदीरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला, या मुळे काही अडचण जाणवली नाही.

Web Title: The Paithan city is full of devotees and chanting of lord Vitthal on ashadhi ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.