विद्यापीठातील 'औरंगाबाद' नावाच्या ४२ हजार पदव्यांचा कागद होणार रद्दी

By राम शिनगारे | Published: February 8, 2024 12:39 PM2024-02-08T12:39:03+5:302024-02-08T12:40:51+5:30

खरेदी समितीमध्ये १० हजार पदव्यांच्या कागद खरेदीला मंजुरी

The paper of 42 thousand degrees in the BAMU university named Aurangabad will be trashed | विद्यापीठातील 'औरंगाबाद' नावाच्या ४२ हजार पदव्यांचा कागद होणार रद्दी

विद्यापीठातील 'औरंगाबाद' नावाच्या ४२ हजार पदव्यांचा कागद होणार रद्दी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे औरंगाबाद नाव असलेल्या तब्बल ४२ हजार ३२७ पदव्यांच्या कागदाची आता रद्दी होणार आहे. त्यामुळे विद्यापीठास लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे. या प्रकारामुळे पदव्यांच्या कागदाची टंचाई निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटपही थांबले आहे.

विद्यापीठातील परीक्षा विभागात पदव्यांच्या कागदाची प्रचंड टंचाई असल्यामुळे कुलगुरूंच्या अध्यक्षतेत ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीत तत्काळ १० हजार पदव्यांच्या छपाईसाठी कागदाच्या खरेदीस मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाने औरंगाबादचे नामांतर केले. त्यानुसार २६ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात अध्यादेशानुसार सुधारणा करीत विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर हा बदल केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने औरंगाबाद नावाचा कागद असलेल्या तब्बल ४२ हजार ३२७ पदव्यांच्या छपाईस मनाई केली. औरंगाबाद नाव असलेल्या कागदावर छत्रपती संभाजीनगर असा बदल करता येतो का, याची चाचपणीही परीक्षा विभागाकडून करण्यात आली.

मात्र, प्रिंट झालेल्या ठिकाणचा औरंगाबाद शब्द काढून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शब्द टाकणे शक्य नसल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला. त्यामुळे परीक्षा विभागाने तत्काळ औरंगाबाद नावाच्या पदव्यांवर छपाईस मनाई केली. त्यानंतर टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना पदव्यांची आवश्यकता असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर नाव असलेला नवीन १० हजार पदव्यांचा कागद मागविला. मात्र, तो कागदही संपला. त्यानंतर कागदाची खरेदी झाली नसल्यामुळे काही दिवसांपासून छपाई केलेल्या पदव्या देण्यास परीक्षा विभागाकडून बंद करण्यात आलेले आहे.

औरंगाबाद नावाच्या पदवी कागदाचे निर्लेखन
औरंगाबाद नावाचा ४२ हजार ३२७ पदव्यांच्या कागदाचे समितीच्या मान्यतेनंतर निर्लेखन केले जाणार आहे. त्यानुसार औरंगाबाद नावाच्या पदव्यांचा कागद एक तर जाळून टाकला जाईल. अन्यथा जमिनीत कायमस्वरूपी गाडला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कागदाच्या खरेदीला मान्यता
विद्यापीठ खरेदी समितीच्या ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जुन्याच वेंडरकडून आणखी १० हजार पदव्यांच्या कागदाची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच दीक्षान्त सोहळ्यासाठी पदव्यांच्या छपाईला नवीन निविदा मागवून कागद खरेदी होईल. त्याशिवाय गुणपत्रिकांच्या कागदही खरेदीस मान्यता मिळाली आहे.

उत्तरपत्रिकांचे काय होणार?
मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांची खरेदी केलेली आहे. त्या उत्तरपत्रिकांवरही औरंगाबाद हे नाव असून, त्यांचा वापर नुकत्याच झालेल्या सत्र परीक्षेत केला आहे. उत्तरपत्रिकांचा वापर संपल्यानंतर त्याचे काही महिन्यांनी निर्लेखन केले जाते. त्यामुळे पदव्यांच्या कागदासारखा कायमस्वरूपी वापर उत्तरपत्रिकांचा होत नसल्यामुळे त्याचा वापर परीक्षेत केल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: The paper of 42 thousand degrees in the BAMU university named Aurangabad will be trashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.