भगवान भक्तीगडावर यावर्षी गर्दीचा उच्चांक पाहायला मिळेल: दसरा मेळावा कृती समिती
By विकास राऊत | Published: September 28, 2022 01:23 PM2022-09-28T13:23:56+5:302022-09-28T13:24:53+5:30
या मेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने, उस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
औरंगाबाद: लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची दसरा मेळाव्याची परंपरा अखंड ठेवत, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र सुपे सावरगाव (घाट) येथील श्री भगवान बाबा भक्ती गडावर या वर्षीचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मागील वर्षी कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित मेळावा आयोजित केलेला असताना सुद्धा अलोट गर्दी दसरा मेळाव्यास लोटली होती. यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त वातावरणात दसरा मेळावा होणार असल्यामुळे गर्दीचा उच्चांक मैदानावर होईल, अशी अपेक्षा दसरा मेळावा कृती समितीचे संयोजक तथा भाजपा प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी व्यक्त केली.
सुरुवातीचे अनेक वर्ष भगवानगडावर हा मेळावा आयोजित केला जात होता, परंतु, मेळाव्याचे ठिकाण अचानक बदलून ही २४ तासामध्ये लाखोंच्या उपस्थितीत दसरा मेळावा संपन्न झाला होता. सुपे सावरगाव येथे भक्ती व शक्तीच्या भावनेने भारावलेल्या जनतेचा उच्चांक रेकॉर्ड असलेला मेळावा पंकजा यांच्या नेतृत्वात पार पडला होता. या मेळाव्यामध्ये राज्यभरामधून व परराज्यातून देखील अनेक भाविक मोठ्या भक्तीभावाने या मेळाव्यास उपस्थित राहत असतात, सर्व ठिकाणाहून येणाऱ्या भक्तगणांना भगवान भक्ती गडावर विविध सामाजिक उपक्रम व सामाजिक संदेशपर भाषण व आगामी काळामध्ये सामाजिक वाटचालीची दिशा देणारे भाषण म्हणून जनतेला मेळाव्याची उत्सुकता असते.
दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी विविध सामाजिक प्रश्न हाताळले आहेत. राज्य व देशभरात मुलीच्या जन्माचे स्वागत वाढवण्यासाठी केलेले उपक्रम असो की मंदिर परिसरातील स्वच्छता कार्यक्रम, तसेच तरुणांमधील व्यसन मुक्तीसाठी निर्धार असे अनेक विषय पंकजा मुंडेंनी हाताळले आहेत व एक प्रचंड मोठा सामाजिक संदेश व समाज परिवर्तनाची शिक्षणाची व सामाजिक संदेश देण्याची दिशा समाजाला यामधून मिळते. दिवंगत स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ही या दसरा मेळाव्यामधून गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांचे प्रश्न, ऊसतोड कामगारांचे प्रश्न व त्यांच्या समस्या सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्यांचे विषय मांडले आहेत व ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते, या मेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने, उस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. असे या वेळी पत्रकार परिषदेत दसरा मेळावा कृती समितीच्यावतीने संयोजक प्रवीण घुगे यांनी केले. यावेळी नवनाथ महाराज आंधळे, सतीश नागरे, मनोज भारस्कर, दीपक ढाकणे आदी उपस्थित होते.