महाराष्ट्राच्या जनतेने चारसौ पारवाल्यांना जमिनीवर आणले; आघाडीच सत्तेत येणार: सचिन पायलट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 07:14 PM2024-11-12T19:14:39+5:302024-11-12T19:17:39+5:30
डबल इंजिन सरकार फक़्त धूर फेकणारे असल्याची टीकाही सचिन पायलट यांनी केली
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. येथील जनतेने चारसौ पारवाल्यांचा स्वप्नभंग करुन त्यांना जमिनीवर आणले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच आहे, असा विश्वास काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सोमवारी मुकुंदवाडी येथील प्रचार सभेत व्यक्त केला.
फुलंब्री मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विलासबापू औताडे व औरंगाबाद पूर्वचे उमेदवार लहू शेवाळे यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. पायलट यांनी, बटेंगे तो कटेंगे हा नारा योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या संवैधानिक पदावरील व्यक्तीला शोभा देत नसल्याचे सांगत ‘पढोंगे तो बढोंगे’ हे आमचे त्यांना प्रत्युत्तर असे बजावले.
महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत कसे आले हे देशाला माहिती आहे. सत्ताधारी पक्ष जाती-धर्माचा वापर करून राजकारण करत आहे. मात्र त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्या, युवक, महिलांच्या समस्यांकडे लक्ष नाही. आश्वासने दिली जातात. मात्र, ती पाळली जात नाहीत. संविधानात सर्वांना समान अधिकार आहेत, मात्र त्यालाच विरोध होत आहे. भाजप त्यांच्या विरोधकांना ईडी, पोलिस यांच्या माध्यमातून बदनाम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, विलास औताडे, लहू शेवाळे, सूर्यकांता गाडे, दिनकर ओंकार, मोहनराव देशमुख आदींची भाषणे झाली.
खोके सरकार -थोरात
महायुती सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. खोक्याचा वापर करून ते सत्तेत आले. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. मात्र त्यांना सत्ता लाडकी आहे. त्यामुळे काँग्रेसला अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या विलास औताडे यांना निवडून आणा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.