प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रसूतीची टक्केवारी घसरली; जिल्हा परिषद ‘सीईओं’चे फर्मानही चालेना
By विजय सरवदे | Published: October 21, 2023 01:18 PM2023-10-21T13:18:43+5:302023-10-21T13:20:39+5:30
तीन महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७९ उपकेंद्रांची झाडाझडती घेतली होती.
छत्रपती संभाजीनगर : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमित तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर महिलांपैकी तब्बल ८८ टक्के महिला प्रसूतीसाठी मोठी सरकारी रुग्णालये किंवा खासगी रुग्णालयांना पसंती देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ १२ टक्केच प्रसूती होत आहेत. तथापि, अलीकडे आरोग्य केंद्रात तब्बल २७५ आरोग्य सेविकांची (परिचारिका) पदे रिक्त असल्यामुळे प्रसूतीचे प्रमाण घटले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तीन महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्याकडे ग्रामीण आरोग्यसेवा कोलमडल्याबाबत प्राप्त तक्रारींवरून त्यांनी जिल्ह्यातील सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७९ उपकेंद्रांची झाडाझडती घेतली. तेव्हा अनेक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहात नसल्याचे दिसून आले. आरोग्य केंद्रांत प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सरकारी रुग्णालये किंवा खासगी रुग्णालयांकडे रेफर केल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्याच्या नोंदी घेण्यात आलेल्या नव्हत्या. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळेच आरोग्य केंद्रांत प्रसूतीचे प्रमाण घटले असल्याचा निष्कर्ष काढत ‘ सीईओ’ मीना यांनी यापुढे किमान २५ टक्के प्रसूती आरोग्य केंद्रांत झाल्या पाहिजेत, असा फतवाच काढला.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर यांनी दर आठवड्याला आरोग्य केंद्रांचा आढावा घेतला. अचानक भेटी वाढविल्या, तरीही प्रसूतीचे प्रमाण १२ टक्क्यांहून पुढे गेलेले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता, आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांची असलेली कमतरता, उपलब्ध थोड्याफार परिचारिकांकडे दैनंदिन ओपीडीबरोबर मिशन इंद्रधनुष्य, आयुष्मान भव उपक्रमांतर्गत तपासणी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढणे, १८ वर्षे वयापुढील व त्याखालील मुलांची तपासणीची कामे याशिवाय, पहिली प्रसूती असेल तर शक्यतो अशा महिलांना सरकारी रुग्णालयांकडे रेफर केले जाते. सिझर प्रसूतीचा इतिहास असलेल्या महिलांना सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सहजपणे रक्ताची उपलब्धता असणाऱ्या हॉस्पिटलकडे रेफर केले जाते. त्यामुळे आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण कमी झाले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
आरोग्य केंद्रांतील तालुकानिहाय प्रसूतीची सद्यस्थिती
तालुका - गरोदर महिला - आरोग्य केंद्रांतील प्रसूती
छत्रपती संभाजीनगर - ८,०६६- १६८, फुलंब्री - २,९५०- १४६, सिल्लोड- ५,७९७- ६०७, सोयगाव- २,१४५- ५५, कन्नड- ५,९३२- ५७५, खुलताबाद- १,९६९- १०९, गंगापूर- ६,७५६- १५८, वैजापूर- ४,८५१- २९७, पैठण- ५,८९३- १६६ .