इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय
By योगेश पायघन | Published: February 27, 2023 07:05 PM2023-02-27T19:05:17+5:302023-02-27T19:05:52+5:30
भारतीय भाषेतील संशोधनाचे वाढलेले प्रमाण आणि संशोधनातील गुणवत्ता राखण्यासाठी प्लॅगॅरिझम साॅफ्टवेअर घेऊन ते शोधप्रबंधांच्या तपासणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर : विविध विषयांत विद्यावाचस्पती अर्थात पीएच.डी. पूर्ण करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ६० वर्षांत संशोधन करून जेवढ्या जणांनी डाॅक्टरेट मिळवली. त्यापेक्षा अधिक विद्यार्थी सध्या विविध विषयांत संशोधन करत असल्याने आगामी ४ ते ५ वर्षांतच गेल्या साठ वर्षांची आकडेवारी पार होणार आहे. आतापर्यंत झालेल्या संशोधनात इंग्रजीचा रुबाब कायम असून, मराठी भाषेतून संशोधनाचा टक्का वाढतोय. हिंदी तिसऱ्या स्थानी तर पाली, संस्कृत, उर्दू भाषेतून संशोधन तुरळक प्रमाणात होत आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या ७ हजार ७४४ विद्यार्थ्यांची पीएच. डी. संशोधनासाठी सध्या नोंदणी आहे. त्यापैकी तब्बल ३ हजार ३७४ अर्थात ४३.५६ टक्के संशोधकांची नोंदणी मानव्यविद्या शाखेतील असून, अनेकांची संशोधन भाषा मराठी आहे. १९६२ ते २००९ पर्यंत ३ हजार ९४ जणांनी तर २००९ ते २०२२ पर्यंत ४ हजार ४६० जणांनी संशोधन पूर्ण केले आहे. २००९ पर्यंत इंग्रजीतून संशोधनाचे प्रमाण ७६.२३ टक्के होते ते आता ७१.१६ टक्के झाले आहे. तर मराठीतून १५.६७ टक्के असलेल्या संशोधनाचा टक्का २१.७१ पर्यंत पोहोचला आहे. मराठी, हिंदीतून संशोधन वाढले असले तरी टक्केवारीत पिछाडीवर गेल्याने तिसऱ्या स्थानी आहे.
पाली, संस्कृत, उर्दू भाषेतून संशोधन वाढताना दिसत असले तरी हे प्रमाण एकूण संशोधनाच्या अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असल्याचे ज्ञानस्रोत केंद्राचे संंचालक डाॅ. धर्मराज वीर यांच्या ‘द डाॅक्टरल रिसर्च’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. केवळ संकलन न होता संशोधनात नवे विचार, मांडलेल्या विचारांचे संशोधनातून खंडन-मंडन होणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.स्वतंत्र चाैकट\मराठी संशोधनाची प्लॅगॅरिझम \\साॅफ्टवेअरमधून होईल तपासणी\इंग्रजी संशोधनात वाङ्मय चाैर्यासंदर्भात तपासणीच्या साॅफ्टवेअरचा वापर सध्या सुरू आहे. तशी मराठी, हिंदीसह इतर भाषांतील शोधप्रबंधांसाठी युनिकोडचा स्वीकार करून तशी तपासणी व्हावी, असाही मतप्रवाह आहे.
भारतीय भाषेतील संशोधनाचे वाढलेले प्रमाण आणि संशोधनातील गुणवत्ता राखण्यासाठी प्लॅगॅरिझम साॅफ्टवेअर घेऊन ते शोधप्रबंधांच्या तपासणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
संकलनाची वाढलेली वृत्ती चिंताजनक
पुनर्अभ्यास, पुनर्आकलन, पुनर्विचार आणि पुनर्मांडणी होऊन सामाजिक संदर्भांचा विचार, समाज उपयोगिता संशोधनात गरजेची आहे. सध्या संशोधनात अभ्यासापेक्षा संकलनाची वाढलेली वृत्ती चिंताजनक वाढते. अलक्षित विषयांचा भाषिक अभ्यासात विचार व्हावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे संशोधनातील वाढते प्रमाण, आर्थिक पाठबळामुळे वाढलेल्या संख्यात्मक संशोधनात गुणात्मक समृद्धता येणे गरजेचे आहे.
-डाॅ. कैलास अंभुरे, सहा. प्राध्यापक, मराठी विभाग, डाॅ. बा. आं. म. वि. औरंगाबाद.
भाषा - शोधप्रबंध - टक्केइंग्रजी - ५५०३ - ७१.१६
मराठी - १६७९ - २१.७१
हिंदी - ४९२ - ६.३६
संस्कृत - २६ - ०.३३
उर्दू - १७ - ०.२१
पाली - १६ - ०.२०
एकूण - ७७३३ - १००
दशकनिहाय पीएच. डी. संशोधनवर्ष - पीएच. डी.
१९६२-१९७० - ६६
१९७१-१९८० - ३१९
१९८१-१९९० - ५७२
१९९१-२००० - ८६६
२००१-२००९ - १२७१
२०१०-२०२० - ३८१५
२०२१-२०२२ - ८५५