डेडलाईन हुकली, लसीकरणाचा टक्का वाढेना; जिल्ह्यातील निर्बंध हटेना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:52 PM2022-03-21T12:52:37+5:302022-03-21T12:53:11+5:30
१५ मार्चपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची डेडलाइन हुकली आहे.
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे औरंगाबादकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी व मोफत धान्य पुरवठा मिळणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ७ मार्च रोजी देऊनही लसीकरणाचा टक्का वाढत नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. सवलतींवर गदा आणण्याच्या इशाऱ्याला कुणी जुमानत नसल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम आहेत.
१५ मार्चपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची डेडलाइन हुकली आहे. सध्या जिल्ह्यातील ९ ते १० लाख नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र आहेत. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २८ लाख ८० हजारांवर असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १९ लाख ९८ हजारांपर्यंत गेली आहे.८ नोव्हेंबर २०२१ नंतर लसीकरण वाढले; मात्र मागील अडीच महिन्यांत लसीकरणाचा टक्का घसरला. परिणामी, जिल्हा अ वर्गात न आल्याने निर्बंध लागू झाले. वारंवार इशारा देऊनही नागरिक लस घेण्यास पुढे येत नाहीत. त्यातच प्रशासकीय यंत्रणादेखील सुस्तावली.
या आदेश, सूचनांचे करायचे काय?
विशेष पथकाची नियुक्ती केली, यात महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीचा वेग वाढविण्यासाठी सूचना दिल्या. पेट्रोलपंप, घरगुती गॅस सिलिंडर, वितरण एजन्सी, रेशनवरील स्वस्त धान्य दुकान, मॉल, हॉटेल, मोठी दुकाने या ठिकाणी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत की नाही, याचे प्रमाणपत्र बारकाईने तपासले जात आहेत की नाही, याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले. पण लसीकरणाचा टक्का काही वाढेना.
सुमारे दहा लाख जणांना कधी देणार दुसरा डोस?
शहरातील एक लाख ६० हजार लोकांचा दुसरा डोस घेण्याची तारीख निघून गेली आहे, तर ग्रामीण भागात साडेआठ लाखांच्या आसपास हा आकडा आहे. शहरातील एक लाख ८० हजार नागरिकांनी अजून पहिला तर ग्रामीण भागातील चार लाख नागिरकांनी पहिला डोस घेतलेला नाही.