गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती!
By विकास राऊत | Updated: October 14, 2024 16:24 IST2024-10-14T16:23:31+5:302024-10-14T16:24:01+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय उलथा-पालथी झाल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे

गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती!
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तीन, तर शिवसेनेच्या सहा जागा मतदारांनी निवडून दिल्या होत्या. शिवसेना-भाजपा युतीने २०१९ सालच्या निवडणुकीला सामोरे गेले होते. परंतु निवडणुकीनंतर युती तुटली. तसेच २०२२ साली शिवसेनेचे दोन गट झाले. उद्धवसेना, शिंदेसेना असे शिवसेनेचे दोन गट झाले. तर २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेसेचे अजित पवार आणि शरदचंद्र पवार, असे दोन गट झाले. मागील पाच वर्षांत राज्यातील राजकारणात झालेल्या भूकंपाचे हादरे जिल्ह्याच्या राजकारणालाही बसले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक राजकीय उलथा-पालथी झाल्या. आता पुन्हा २०२४ च्या विधानसभा निवडणुका समोर असून, डाव मतदारांच्या हाती आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार व अजित पवार गट, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम असे मूळ नऊ पक्ष निवडणुकीच्या मैदानात असतील. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना असला, तरी इतर पक्षांचे उमेदवार जिल्ह्याच्या राजकारणाचे समीकरण बदलण्याची तयारी करीत आहेत.
जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ सध्या आहेत. त्यातील ६ जागांवर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आताच्या ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेना म्हणून निवडून आले. त्यातील पाच आता शिंदेसेनेत आहेत, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून आले होते. जिल्ह्यात सध्या शिंदसेनेकडे पाच, भाजपाकडे तीन तर ठाकरे सेनेकडे १ जागा आहे. नऊपैकी ६ जागांवर ठाकरे सेना, तीनवर भाजप
तीनच उमेदवार होते लाखांच्या पुढे
२०१९ साली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील फक्त तीन उमेदवारांना १ लाखांच्या पुढे मतदान घेता आले होते. यातील राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १०६१९०, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना १२३३८३, आ. प्रशांत बंब यांना १०७१९३ मते मिळाली होती.
विधानसभा..................... विजयी उमेदवार....................मिळालेली मते .................... तेव्हाचा पक्ष कोणता?
औरंगाबाद पूर्व................गृहनिर्माण मंत्री अतुल सावे............. ९३९६६............................भाजप
फलंब्री.........................आ. हरिभाऊ बागडे (पद रिक्त).....१०६१९०..............................भाजप
सिल्लोड....................पालकमंत्री अब्दुल सत्तार..............१२३३८३.............................शिवसेना
कन्नड.........................आ. उदयसिंग राजपूत..............७९२२५.................................शिवसेना
वैजापूर........................आ. रमेश बोरणारे.................९८१८३.............................शिवसेना
गंगापूर.............................आ. प्रशांत बंब..............१०७१९३.................................भाजप
पैठण..............................खा. संदिपान भुमरे (पद रिक्त).....८३४०३.......................शिवसेना
औरंगाबाद पश्चिम..............आ. संजय शिरसाट...............८३७९२.............................शिवसेना
औरंगाबाद मध्य .................आ. प्रदीप जैस्वाल ..........८२२१७................................शिवसेना
जिल्ह्यातील पक्षीय बलाबल असे
भाजप : ३
शिंदेसेना : ५
उद्धवसेना: ०१
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: ००
कॉंग्रेस: ००
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार : ००