निकृष्टतेचा कळस; छत्रपती संभाजीनगरच्या ५१ वर्ष जुन्या जलवाहिन्यांपेक्षा वर्षभरापूर्वीची जलवाहिनी अधिक फुटते !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:56 IST2025-03-24T14:56:12+5:302025-03-24T14:56:44+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

निकृष्टतेचा कळस; छत्रपती संभाजीनगरच्या ५१ वर्ष जुन्या जलवाहिन्यांपेक्षा वर्षभरापूर्वीची जलवाहिनी अधिक फुटते !
छत्रपती संभाजीनगर : शहरातील १८ लाख नागरिकांची तहान सध्या तीन जलवाहिन्यांवर अवलंबून असून, यातील दोन जलवाहिन्यांचे आयुष्य ५० आणि ३३ वर्षे आहे. नियमानुसार या जलवाहिन्या कालबाह्य झालेल्या आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्याचा ९० टक्के भार आजही याच जलवाहिन्या उचलत आहेत. सातत्याने या जलवाहिन्या फुटत असतात. पण, मागील वर्षीच टाकलेली ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी मागील तीन महिन्यांत तब्बल पाच वेळा फुटली. या जलवाहिनीच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
शहराला पूर्वी हर्सूल तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. १९७३ च्या दुष्काळात हर्सूल तलावातही पाणी नव्हते. तेव्हा हिमायतबागेतील शक्करबावडीने शहराची तहान भागविली होती. तत्कालीन मंत्री डॉ. रफीक झकेरिया यांनी युद्धपातळीवर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकून दिली. कालांतराने या जलवाहिनीचे पाणी कमी पडू लागल्याने १९९२ मध्ये १२०० मिमी व्यासाची दुसरी जलवाहिनी टाकली. म्हणजे ७०० च्या जलवाहिनीचे आयुष्य ५० वर्षांहून अधिक, तर १२०० च्या जलवाहिनीचे ३३ वर्षांहून अधिक झाले. ऑक्सिजनवर असल्यासारखी या जलवाहिन्यांची अवस्था झाली आहे.
२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे पाणी येण्यास विलंब होत असल्याने मागील वर्षी तातडीने ९०० मिमीची जलवाहिनी खास शहरासाठी टाकली. तीही मागील तीन महिन्यांत पाच वेळेस, तर वर्षभरात १२ वेळेस फुटल्याची माहिती आहे.
९०० ची जलवाहिनी तीन महिन्यांत कुठे फुटली ?
- २० जानेवारीला फारोळा येथे जलवाहिनीचे पाइप निखळले.
- २१ रोजी दुरुस्ती करताना पुन्हा जलवाहिनीचे पाइप त्याच ठिकाणी निखळले.
- ८ फेब्रुवारीला धनगाव येथे जलवाहिनीला अक्षरश: भगदाड पडले होते.
- १० मार्चला टाकळी फाटा येथे जलवाहिनी फुटली.
- २२ मार्चला फारोळा येथे जलवाहिनीचे पाइप निखळले.
७०० आणि १२०० जलवाहिन्या तीन महिन्यांत कुठे फुटल्या ?
- १४ फेब्रुवारीला ७०० मिमी जलवाहिनी पिंपळवाडी येथे फुटली.
- ७ मार्चला जायकवाडी तांत्रिक बिघाड दोन दिवस शहराचे पाणी बंद
- ३ मार्चला ७०० मिमी जलवाहिनी जायकवाडीजवळ फुटली.
-२२ मार्चला रेल्वेस्टेशनजवळ १२०० मिमीची दुरुस्ती ३० तासांचे शटडाऊन.
मागील वर्षभरात कोणती जलवाहिनी किती वेळेस फुटली ?
जलवाहिनीचा व्यास-------------------------किती वेळेस ?
७०००---------------------------------------१०
९००-------------------------------------------९
१२००----------------------------------------८