जागा सिडकोची, मालक मात्र दुसराच; गुंठेवारीने झाला 'कळस', आता फाइलची तपासणी सुरू

By मुजीब देवणीकर | Published: April 12, 2023 08:21 PM2023-04-12T20:21:53+5:302023-04-12T20:22:14+5:30

मनपाच्या नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाडस यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे.

The place belongs to CIDCO, but the owner is different; 'Kalas' was done by Gunthewari, now the examination of the file has started by Municipality | जागा सिडकोची, मालक मात्र दुसराच; गुंठेवारीने झाला 'कळस', आता फाइलची तपासणी सुरू

जागा सिडकोची, मालक मात्र दुसराच; गुंठेवारीने झाला 'कळस', आता फाइलची तपासणी सुरू

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सिडको प्रशासनाने अद्यापही शहरात काही जागा विक्रीसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. रोजाबाग परिसरातील गितानगर येथे सिडकोने काही जागा विक्रीसाठी शिल्लक ठेवली. त्यावर काही भागात अतिक्रमण झाले. उर्वरित खुल्या जागेवर काही नागरिकांनी बॉण्ड पेपरच्या आधारे दावा केला. महापालिकेच्या नगररचना विभागाने डोळे मिटून गुंठेवारी कायद्यानुसार त्यावर ‘कळस’ चढविला. हा प्रकार सिडको प्रशासनाच्या निदर्शनास आला. त्यांनी स्थळ पाहणी अहवाल वरिष्ठांना सादर केला. मनपानेही गुंठेवारीच्या फाइलची चौकशी सुरू केली.

मनपाच्या नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाडस यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. नियम, कायदा याची कोणतीही भीती न बाळगता अनधिकृतपणे कामे केली जातात. आरक्षित जागांवर बांधकाम परवानग्या, प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच भोगवटा प्रमाणपत्र, डबल टीडीआर असे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचा नवीन प्रताप समोर आला. सिटी सर्व्हे नंबर ११७/ १ गितानगर रोजाबाग येथे सिडकोने काही जागा विक्रीसाठी ठेवली आहे. या जागांवर प्लॉट पाडून विकण्याचा आराखडा तयार आहे. मात्र, सिडकोने ही प्रक्रिया केली नाही. सिडकोच्या मालकीच्या जागेवर एका खासगी व्यक्तीने दावा केला. १०२.९९८ चौरस मीटर जागेच्या गुंठेवारीसाठी फाइल दाखल झाली. महापालिकेचे कनिष्ट अभियंता कारभारी घुगे, उपअभियंता संजय कोंबडे यांनी गुंठेवारी प्रमाणपत्र ५ जानेवारी २०२३ रोजी दिले.

जलद गतीने काम...
खासगी व्यक्तीने ६ डिसेंबर २०२२ रोजी शपथपत्राद्वारे जागा आपल्या मालकीची असून, ती ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची मिळकत असल्याचा उल्लेख केला. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी फाइल दाखल झाल्याच्या सहाव्याच दिवशी खासगी व्यक्तीला १६ लाख रुपये गुंठेवारी शुल्क भरण्यासाठी चलनही दिले. ५ जानेवारीला उपअभियंता यांच्या सहीने गुंठेवारी प्रमाणपत्र दिले.

सिडको- मनपा प्रशासनाचे म्हणणे काय?
गुंठेवारी अजिबात करता येत नाही

गितानगर येथील जागा सिडकोने विक्रीसाठी राखीव ठेवली आहे. त्यावर काही ठिकाणी किरकोळ अतिक्रमणे आहेत. अचानक मोठ्या प्लॉटची गुंठेवारी केल्याचे निदर्शनास आले. स्थळ पाहणी करून आम्ही त्वरित वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील. सिडकोच्या मालकीच्या जागेवर गुंठेवारी अजिबात करता येत नाही. मनपाने केले हे कळत नाही.
- उदय चौधरी, उपअभियंता सिडको

फाइलची तपासणी सुरू केली
गितानगर येथे सिडकोच्या जागेवर गुंठेवारी झाल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी होती. निवृत्त कनिष्ट अभियंता घुगे यांच्या हातावरचा विषय आहे. उपअभियंता म्हणून माझी सही आहे किंवा नाही, माहीत नाही. फाइल काढायला सांगितली. फाइल बघूनच नेमकं काय झालं हे सांगता येईल. तूर्त काहीही सांगता येत नाही.
- संजय कोंबडे, उपअभियंता, मनपा.

Web Title: The place belongs to CIDCO, but the owner is different; 'Kalas' was done by Gunthewari, now the examination of the file has started by Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.