मोठ्या आशेने रोपे आणली, मिरचीचे उत्पादनच झाले नाही; शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:15 IST2025-04-10T18:15:16+5:302025-04-10T18:15:35+5:30
झाडांना मिर्चीच लागली नाही; बोगस रोप तयार करणाऱ्या कंपनी मालक, नर्सरी चालकावर गुन्हा

मोठ्या आशेने रोपे आणली, मिरचीचे उत्पादनच झाले नाही; शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीवर गुन्हा
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: ग्रीन प्लॉटो सिड्स कंपनीच्या सी- वन वाणाच्या झाडांना मिर्चीचे उत्पादनच झाले नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कंपनीचे मालक, चालक, नर्सरी चालक विक्रेते अशा सात लोकांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी १० एप्रिल, गुरुवारी दुपारी २ वाजता गुन्हे दाखल केले आहेत.
बुलढाणा येथील ग्रीन प्लॉटो सिड्स कंपनीचे संचालक श्रीकृष्ण नारायण शिंदे रा.पाडलीशिंदे ता.देऊळगावराजा ,कंपनीचे प्रतिनिधी गणेश परदेशी रा.पाचोरा जि. जळगाव,बियाणे विक्रेते शिवनी ऍग्रो एजन्सी सिल्लोडचे चालक गोपाळ जंजाळ, सिल्लोड तालुक्यातील भायगाव येथील मे आदेश ग्रीनव्हेली रोपवाटीकेचे मालक सतीश दौलत भागवत ,धावडा येथील ओमसाई हायटेक रोपवाटीकेचे मालक हरिदास काशिनाथ दिवटे, सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील श्री साई ऍग्रो नर्सरीचे मालक नामदेव नबाजी जाधव, सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील जानवी हायटेक रोपवाटीकेचे सोमनाथ लक्ष्मण पुरी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुलढाणा येथील ग्रीन प्लॉटो सिड्स कंपनीचे संचालक श्रीकृष्ण नारायण शिंदे यांनी सी-वन नावाच्या मिर्चीचे बियाणे वाण बनावट तयार करून विक्री केले. कंपनीचे प्रतिनिधी गणेश परदेशी यांनी या वाणाची जाहिरात केली.बियाणे विक्रेते शिवनी ऍग्रो एजन्सी सिल्लोडचे चालक गोपाळ जंजाळ, सिल्लोड तालुक्यातील भायगाव येथील मे आदेश ग्रीनव्हेली रोपवाटीकेचे मालक सतीश दौलत भागवत यांनी सदर बनावट रोपांची विक्री केली. आरोपी हरिदास काशिनाथ दिवटे, नामदेव नबाजी जाधव, सोमनाथ लक्ष्मण पुरी यांनी नर्सरीसाठी कृषी विभागाचा परवाना नसतांना मिरची बियाणे वाण सी वन बनावट वाणाची रोपे तयार करून २७ फेब्रुवारी २०२४ ते ३० जुलै २०२४ पर्यंत अनेक शेतकऱ्यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली, अशी तक्रार बियाणे निरीक्षक संतोष भालेराव यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलिसांनी वरील सात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले.
झाडांना मिर्चीच लागली नाही
मिर्चीच्या झाडांना कळ्या, फुल, मिरची काहीच लागली नाही. नंतर सर्व मिरची पिके उध्वस्त झाल्याची तक्रार जुलै - ऑगस्ट २०२४ मध्ये शेतकरी विलास अण्णा मुळे ( रा केळगाव ता सिल्लोड) , सुरेश नाना मुळे ( रा केळगाव) , योगेश अशोक आहेर ( रा निल्लोड) , शंकर किसन मांडवे ( रा रेलगाव) , योगेश दादाराव फरकाडे ( रा.पिंपळदरी) यांनी सिल्लोड तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन प.स.कृषी अधिकारी संजय व्यास, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी न्यानेश्वर बरदे, कृषी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र नैनवाड, डॉ. आशिष बागडे, मंडळ कृषी अधिकारी एस. जी. तोटरे, प्रमोद डापके यांनी शेताची आणि नर्सरीमधून विक्री झालेल्या मिरची रोपांची पाहणी करून पंचनामे केला. काही नमुने प्रयोग शाळेत तपासणीस पाठवले होते. त्याबियाणे दोषी आढळले. ९ एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी बियाणे निरिक्षक संतोष भालेराव यांनावरील लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले.