पाेलिसांनी दाखवला हिसका; चार महिन्यात लातूर जिल्ह्यात ४ कट्टे, १०० तलवारी जप्त!
By राजकुमार जोंधळे | Published: April 29, 2023 08:01 PM2023-04-29T20:01:32+5:302023-04-29T20:02:31+5:30
चार महिन्यांत गळाला लागले अनेक सराईत गुन्हेगार...
लातूर : जानेवारी ते एप्रिलअखेर लातूर पाेलिसांनी अनेक गुन्हेगारांना, टवाळखाेरांना चांगला हिसका दाखविला आहे. त्यांच्याकडून चार गावठी कट्टे, शंभरावर तलावारी, कत्ती आणि इतर घात शस्त्र जप्त केली आहेत. याप्रकरणी अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू आहेत. ही माहिती त्या-त्या भागातील त्रस्त नागरिक थेट पाेलिस अधीक्षकांच्या माेबाइल क्रमांकावर पाठवत आहेत. माहितीची खातरजमा केल्यानंतर पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानंतर विशेष पथकांकडून धाडीही टाकल्या जात आहेत. जानेवारी ते एप्रिलअखेर जिल्ह्यात अवैध व्यवसायावर, सराईत गुन्हेगारांवर माेठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यात तब्बल १ हजार ७४६ गुन्हे दाखल केले आहेत. धाडसत्रामध्ये पाेलिस पथकाने तब्बल अडीच काेटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दाेन हजारांवर आराेपींविराेधात कारवाई केली आहे.
विविध प्रकारचे दाखल केले गुन्हे...
लातूर पाेलिसांनी केलेल्या कारवाईत दारूबंदी कायद्यानुसार तब्बल १ हजार ३६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मटका, जुगारप्रकरणी ३४९ गुन्हे आणि अवैध गुटखाविक्री आणि साठाप्रकरणी ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाेलिस अधीक्षकांची जिल्ह्यात विशेष माेहीम...
पोलिस अधीक्षकांनी लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती कळावी म्हणून त्यांनी नागरिकांसाठी स्वतःचा मोबाइल क्रमांक जाहीर केला. अवैध व्यवसायाची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जात असल्याने कारवाईचा धडाका सुरूच आहे. यातून नागरिकांनाही काही प्रमाणावर दिलासा मिळत आहे.
आठ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई...
लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या आठ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर एका गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. शिवाय, अनेकांच्या तडीपारीचे प्रस्ताव पडून आहेत.
अफू, गांजाची विक्री; दाेघांविराेधात गुन्हे...
लातूरसह जिल्ह्यात गांजा, अफूची चाेरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या दाेघांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. दरम्यान, त्यांच्याकडून ४ लाख ६४ हजार रुपयांचा तब्बल ४० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात चाेरट्या मार्गाने गांजाची विक्री अलीकडे वाढली आहे