गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी पाठलाग करत पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 05:03 PM2023-10-11T17:03:02+5:302023-10-11T17:03:25+5:30
जामगाव येथे अंधारात एक किमी पाठलाग करून घेतले ताब्यात
- जयेश निरपळ
गंगापूर (छत्रपती संभाजीनगर): देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंडसह वावणाऱ्या व अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या एका सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी तालुक्यातील जामगाव येथे कारखाना परिसरात मंगळवारी(१०)रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पाठलाग करून ताब्यात घेतले;महेश काशीनाथ काळे(२८)रा.जामगाव असे कट्टा बाळगणाऱ्या आरोपींचे नाव असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की गंगापूर पोलिस ठण्याचे पोनि सत्यजीत ताईतवाले हे जामगाव परिसरात गस्तीवर असताना त्यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की येथे सराईत गुन्हेगार महेश काळे कमरेला कट्टा लावून वावरत असून तो साखर कारखाना परिसरात दारू पिण्यासाठी जात आहे. त्या माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास साखर कारखाना परिसरात सापळा लावला. आरोपी महेश काळे त्या परिसरातून जात असताना पोलिसांनी त्याला हटकले. मात्र त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्यास कारखान्यासमोर असलेल्या जिप शाळेच्या मैदानात ताब्यातून ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा, दोन जिवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत सफौ थोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश काशीनाथ काळे(२८)रा.जामगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई पोनि सत्यजीत ताईतवाले,सफौ दिनकर थोरे,पोकॉ अमोल कांबळे,अभिजित डहाळे,अतुल भवर,विजय नागरे,तेनसिंग राठोड,राहुल वडमारे यांच्या पथकाने पार पाडली
अनेक गुन्ह्यात हवा होता आरोपी
आरोपी महेश काळे हा सराईत गुन्हेगार असून सन २०१६ ते आतापर्यंत त्याच्यावर गंगापूरसह अहमदनगर,वाळूज,वीरगाव येथील पोलिस ठाण्यात एकूण १४ गुन्हे दाखल आहे यात प्राण घातक हल्ला करणे,चोरी,दरोडा,मारहाण,अवैध शस्त्र बाळगणे,विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांच्या समावेश असून पोलिस त्याच्या मागावर होते.अनेक गुन्ह्यात हवा असलेल्या आरोपी महेश काळेला गंगापूर पोलिसांनी जेरबंद केल्याने गंगापूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.