पोलिसाने सूड उगवला; खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ठेवला किराणा दुकानात गांजा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:59 AM2022-06-10T11:59:13+5:302022-06-10T12:00:13+5:30
सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग : पाेलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसासह चार आरोपींना बेड्या
औरंगाबाद : फुलंब्री येथील किराणा दुकानात चार किलो गांजा सापडल्याची कारवाई २७ मे रोजी पोलिसांनी केली होती. या प्रकरणात किराणा दुकानदारास अटक केल्यानंतर पोलीस कोठडी मिळाली. या काेठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर जामीन मिळाला. बाहेर आल्यानंतर किराणा दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज काढून कोणीतरी फसविण्यासाठी गांजा ठेवल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यानुसार केलेल्या तपासात जुन्या वादाचे उट्टे काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यानेच दुकानात गांजा ठेवल्याचे स्पष्ट झाले. या पोलिसासह त्याच्या तीन साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फुलंब्री येथील किराणा दुकानदार दादासाहेब मोरे यांच्या गणेश किराणा ॲण्ड पशुखाद्य ढेपवर २७ मे रोजी पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात चार किलो गांजा सापडला. पोलिसांनी मोरे यांना अटक केली. सुरुवातीला त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्यांना जामीन मिळाल्यानंतर मोरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा २६ मे रोजी एक जण गुपचूप गांजा असलेली बॅग ठेवताना दिसला. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सीसीटीव्ही फुटेज दिले, कलवानिया यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले.
तपासात किराणा दुकानात अर्जुन शेषराव राठोड (रा. हिरापूर, ता. फुलंब्री) या पोलीस कर्मचाऱ्याने मोरे यांच्यासोबतच्या वैयक्तिक वादामुळे सचिन डोंगरे, विशाल फाजगे, राहुल दहिहंडे (सर्व रा. शेंद्रा) या तिघांच्या मदतीने दुकानात गांजा ठेवण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले. तीन आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांंनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांचा फरार सहकारी राहुल दहिहंडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून उचलल्याची माहिती कलवानिया यांनी दिली. अर्जुन, सचिन, विशाल यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
प्रकरण चिकलठाणा ठाण्यात वर्ग
अधीक्षकांनी हा तपास चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक देविदास गात यांच्याकडे दिला आहे. तसेच हा गुन्हाही चिकलठाण्यात वर्ग केला आहे. पोलीस दलाची प्रतिमा डागाळणाऱ्या कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.