चोरीच्या पद्धतीने पोलीसही चक्रावले;हिमाचलहून आलेले सफरचंद पोहोचले मुंबईत व्हाया औरंगाबाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:37 PM2022-07-21T19:37:39+5:302022-07-21T19:38:29+5:30
चोरट्याने पहाटे साडेतीन वाजता पिकअपमधील ३० बॉक्स रिक्षात भरून नेत पुण्याला जाणाऱ्या ९ ट्रॅव्हल्समध्ये टाकले.
औरंगाबाद : हिमाचल प्रदेशातून शहरात विकण्यासाठी आणलेल्या सफरचंदाचे बॉक्स व्यापाऱ्याने रात्री जालना येथे नेण्यासाठी पिकअपमध्ये भरून ठेवले होते. बॉक्सने भरलेला पिकअप रस्त्यावर उभा करून घरी गेल्यानंतर चोरट्याने पहाटे साडेतीन वाजता त्यातील ३० बॉक्स रिक्षात भरून चुन्नीलाल पेट्रोल पंप येथे नेले. तेथून चार वाजता पुण्याला जाणाऱ्या ९ ट्रॅव्हल्समध्ये बॉक्स टाकले. पुण्यात बॉक्स उतरून तेथून मुंबईला नेऊन विकल्याचा प्रकार उघडकीस आला.
निसार अहेमद ऊर्फ सलमान गफार पठाण (रा. गल्ली क्र. ११, बायजीपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. रेहान मुश्ताक बागवान (रा. छोटा तकिया, नूतन कॉलनी) हा फळ विक्रेता आहे. त्याने १६ जुलैच्या रात्री पैठण गेट ते क्रांती चौक रोडवरील मुनलाईट हॉटेलसमोर पिकअपमध्ये (एमएच २०, डीई ४०४०) सफरचंदाचे १०० बॉक्स भरून ते वाहन तेथे उभा करून ठेवले. १७ जुलैला मध्यरात्री दीड वाजता तो घरी गेला. सकाळी सहा वाजता येऊन तो हा माल जालना येथे घेऊन जाणार होता. मात्र, तेव्हा चोरीचा प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून सफरचंदाचे ३० बॉक्स लंपास केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास खटके, सहायक उपनिरीक्षक नसीम पठाण, हवालदार संतोष मुदीराज, नरेंद्र गुजर, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भाऊलाल चव्हाण, हनुमंत चाळणेवाड यांनी तपास सुरू केला. त्यांना घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज मिळाले तसेच सफरचंदाचे बाॅक्स हरी ओम ट्रॅव्हल्समध्ये पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भरल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून सफरचंदाचे बॉक्स मुंबईला नेल्याचे माहिती मिळविली. त्यानंतर निसार अहेमद ऊर्फ सलमान या बेड्या ठाेकण्यात आल्या.
चोरट्याची मोडस निराळीच
चोरटा निसार अहेमद याने यापूर्वीही जवाहरनगर हद्दीतील एका टायरच्या दुकानात चोरी करताना लोडिंग रिक्षातून टायर चोरी केले होते. ते टायर रेल्वेस्थानक परिसरात रस्त्यावर उतरविले. त्यानंतर तेथून वाळूज भागातील एका गोडाऊनमध्ये नेले. या प्रकारे सफरचंदही ऑटो रिक्षातून दोनवेळा १५ बॉक्स घेऊन गेला.