डॉक्टरांच्या मदतीला गेलेल्या पोलिसांना बेल्टने मारहाण
By राम शिनगारे | Published: August 6, 2023 04:54 PM2023-08-06T16:54:40+5:302023-08-06T16:56:10+5:30
रस्त्यात गाडी लावलेल्या व्यक्तीस मारहाणीविषयी चौकशी करीत असतानाच तिघांनी मिळून एका पोलीस कर्मचाऱ्यास पकडून बेल्टने मारहाण केली.
छत्रपती संभाजीनगर - शरद टी पॉईट येथील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांना एकजण बेल्टने मारहाण करीत होता. डॉक्टराच्या मारहाणीची तक्रार सिडको पोलिसांच्या ११२ वर आल्यानंतर दोन पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी रस्त्यात गाडी लावलेल्या व्यक्तीस मारहाणीविषयी चौकशी करीत असतानाच तिघांनी मिळून एका पोलीस कर्मचाऱ्यास पकडून बेल्टने मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ६.३७ वाजता घडला. या प्रकरणी तिघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
डॉक्टरासह पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये शिवानंद गजानन मोरे, गजानन मोरे आणि विजया गजानन मोरे (तिघेही रा. टी.व्ही. सेंटर, हडको) यांचा समावेश आहे. पोलिस अंमलदार उत्तम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शनिवारी सिडको ठाण्यातील ११२ नंबर गाडीवर ड्युटीसाठी होते. एम्स हॉस्पीटलमधून एकजण डॉक्टरास मारहाण करीत असल्याचा फोन ११२ वर आला. त्यानुसार अंमलदार जाधव यांच्यासह अतुल सोळंके हे घटनास्थळी पोहचले. तेव्हा रस्त्यावर आरोपींची गाडी (एमएच २० जीई २५१९) लावलेली होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील गाडी बाजूला घेण्याच्या सूचना करीत असतानाच हॉस्पिटलमध्ये आरोपी शिवानंद मोरे हा हातात बेल्ट घेऊन उभा होता. त्याने पोलिसांनी मी गाडी बाजूला घेणार नाही.
हॉस्पिटल जाळून टाकणार असे मोठमोठ्याने ओरडून सांगत होता. तेव्हा दोन्ही पोलिसांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली. तसेच फिर्यादीच्या गणवेशाची कॉलर पकडून बेल्टने मारहाण सुरू केली. तेव्हा आरोपी शिवानंद याचे आई-वडील गजानन व विजया या दोघांनी कर्मचाऱ्यास पकडले. त्यानंतर तोंडावर, डोळ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. दुसरे कर्मचारी सोळंके हे यांनाही मारहाण केली. तेव्हा त्याठिकाणच्या काही नागरिकांनी पोलिसांची त्यांच्या तावडीतुन सुटका केली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळ्यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला.
आरोपींची हर्सुलमध्ये रवानगी
सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींनी अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आली. त्यानुसार तिन्ही आरोपींना हर्सुल कारागृहात पाठविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास अन्नलदास करीत आहेत.