मिनी अंगणवाड्यांच्या दर्जा वाढला पण सेविकांची पदे अडकली न्यायालयीन कचाट्यात
By विजय सरवदे | Published: March 2, 2024 05:10 PM2024-03-02T17:10:08+5:302024-03-02T17:11:20+5:30
‘थोडी खुशी, थोडा गम’ : ७८१ मिनी अंगणवाड्यांना दर्जा वाढ
छत्रपती संभाजीनगर : शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ७८१ मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यांमध्ये श्रेणी वर्धन (दर्जा वाढ) झाले खरे. पण, त्यातील कार्यरत सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती तसेच श्रेणीवर्धन झालेल्या अंगणवाड्यांमध्ये मदतनिसांची पदभरतीची प्रकिया न्यायालयीन कचाट्यात अडकली. त्यामुळे एकाचवेळी ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी परिस्थिती सेविकांची झाली आहे.
राज्यातील जवळपास १३ हजारांहून अधिक मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करुन त्यांना मोठ्या अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील ७८१ मिनी अंगणवाड्यांचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडे सादर केला होता. त्यास या विभागाने हिरवा कंदिल दाखविला. दुसरीकडे, मिनी अंगणवाड्यांमध्ये कार्यरत अनेक सेविकांच्या खात्यामध्ये मोठ्या अंगणवाड्यांच्या सेविकांप्रमाणे मानधनही जमा झाले. मात्र, मिनी अंगणवाड्यांमध्ये कार्यरत ७७८ सेविकांना सेवाज्येष्ठता, शैक्षणिक अर्हतेनुसार अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्त देण्याची प्रक्रिया एकात्मिक बालविकास विभागाने तूर्तास थांबविली आहे.
दोन्ही अंगणवाड्यांमध्ये फरक काय?
दोन्ही अंगणवाड्यांमध्ये बालके, स्तनदा माता, गरोदर मातांना पोषण आहार, त्यांचे लसिकरण, कुपोषण निर्मुलनाची कामे केली जातात. ८०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांत मोठ्या अंगणवाड्या, तर वाड्या, वस्ती, तांड्यावर जिथे कमीत कमी २०० लोकसंख्या आहे, तिथे मिनी अंगणवाड्या कार्यरत असतात. मोठ्या अंगणवाड्यांत सेविका व मदतनीस अशी दोन पदे कार्यरत असतात, तर मिनी अंगणवाडीमध्ये फक्त सेविका कार्यरत असते.
७८१ मदतनिसांची पदे भरावी लागणार
जिल्ह्यात २६४२ मोठ्या अंगणवाड्यांमध्ये २४५२ सेविका, तर ७८१ मिनी अंगणवाड्यांमध्ये ७७८ सेविका कार्यरत आहेत. दरम्यान, सर्व मिनी अंगणवाड्यांना मोठ्या अंगणवाड्यांचा दर्जा मिळाल्यामुळे तिथे तेवढ्याच मदतनिसांची पदे भरावी लागणार आहेत.
सेविकांची कार्यप्रणाली
अंगणवाडी सेविकांकडे बालकांचे वजन, उंचीच्या नोंदी घेणे, त्यांची सॅम, मॅम श्रेणी निश्चित करणे, बालकांना पूर्व प्राथमिक शालेय शिक्षण देणे, पोषण आहाराचा दर्जाची तपासणी, किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता यांना आहारासंबंधी मार्गदर्शन करणे, पोषण ट्रॅकवर नोंदी घेण्याची कामे असतात.
मतदनिसांची कार्यप्रणाली
मतदनिसांना अंगणवाड्यांची साफसफाई करणे, घरी जावून बालकांना अंगणवाडीत आणणे, त्यांना आहार वाटप करणे, आहार शिजवणे, अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामात मदत करणे, ही कामे करावी लागतात.