‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे
By विजय सरवदे | Updated: July 17, 2024 19:57 IST2024-07-17T19:57:16+5:302024-07-17T19:57:40+5:30
आदर्श गाव कसे असावे, तर ते पाटोदा-गंगापूर नेहरी या ग्रामपंचायतीसारखे. या दोन्ही ग्रामपंचायती देशात आदर्श ठरल्या असून, तिथे देशभरातून लोक भेट देऊन कामांचे कौतुक करत आहेत.

‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे
छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतींमध्ये असलेले राजकीय तंटे व पदाधिकाऱ्यांचा अनुत्साह बघता आदर्श गावे करण्यासाठी निवडलेल्या ६० गावांपैकी आता अवघ्या ३८ गावांनाच सर्व सुविधा पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या गावांमध्ये श्वास्वत विकासाच्या कामांनी वेग देखील घेतला आहे.
आदर्श गाव कसे असावे, तर ते पाटोदा-गंगापूर नेहरी या ग्रामपंचायतीसारखे. या दोन्ही ग्रामपंचायती देशात आदर्श ठरल्या असून, तिथे देशभरातून लोक भेट देऊन कामांचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे आता दुधड ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. या पार्श्वभूमीवर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यात ‘आदर्श ग्राम’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरुवातीला ६० ग्रामपंचायतींची निवडही केली होती. त्या गावांत कायमस्वरूपी स्वच्छता, वापराचे व पिण्याचे शुद्ध पाणी, शाळा, अंगणवाडी सुशोभीकरण, १०० टक्के शौचालयांचा वापर व स्वच्छ परिसर, यासाठी सरपंच व पदाधिकारी तसेच ग्रामसेवकांनी परिश्रम घ्यायचे. त्यांना विविध योजनांचा निधी उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद करेल, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, ग्रामपंचायतींमधील राजकारण तसेच पदाधिकारी व ग्रामसेवकांचा अनुत्साह बघता प्रशासनाने सुरुवातीला निवडलेल्या ६० पैकी ५३ गावांमध्ये ‘आदर्श ग्राम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ३८ गावे अंतिम करण्यात आली आहेत.
कोणत्या कामांवर भर राहील
‘आदर्श ग्राम’साठी निवडलेल्या ३८ गावांमध्ये उत्तम करवसुली, उत्तम स्वच्छता, ओला-सुका कचऱ्याचे वर्गिकरण, कचरा नियोजनासाठी घंटागाडी, शुद्ध पाणीपुरवठा, पाण्याचे नियमित शुद्धीकरण, सोलार ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, गावातील पात्र १०० टक्के नागरिकांना शासकीय योजनांसाठी लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न, १०० टक्के नागरिकांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड, वृक्षारोपण, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीसारख्या सार्वजनिक इमारतींवर आकर्षक रंगरंगोटी, बालकांसाठी स्वतंत्र ग्रामसभा, कुपोषणमुक्त व बालविवाहमुक्त गाव ही कामे प्राधान्याने करावी लागणार आहेत.
तालुकानिहाय गावांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्राबन, वळदगाव, बनगाव, कुंभेफळ, पाटोदा, दुधड, लाडगाव-हिवरा, कन्नड तालुका- देवळाणा, नादरपूर, हस्ता, बहिरगाव, खुलताबाद तालुका-वेरूळ, गदाना, सोनखेडा, गोळेगाव, झरी, गंगापूर तालुका-आसेगाव, गवळीशिवरा, तुर्काबाद, पखोरा, सावंगी, पैठण तालुका-देवगाव, आवडे उंचेगाव, फुलंब्री तालुका-गणोरी, किनगाव, कान्होरी, वैजापूर तालुका-साकेगाव, परसोडा, भग्गाव, लोणी बु., डवाळा, सिल्लोड तालुका-उंडणगाव, पिंपळगाव पेठ, सोयगाव तालुका-जरंडी, वनगाव, हनुमंतखेडा, मोलखेडा.