अहो चक्क प्राध्यापकच फसले! मोबाईल नंबरच्या केवायसीसाठी ॲप घेतले अन सव्वा लाख गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 07:02 PM2022-02-22T19:02:52+5:302022-02-22T19:03:40+5:30
मोबाईल नंबर बंद होईल असा मेसेज येऊन अनोळखी नंबरवरून आला फोन
केज ( बीड ) : मोबाईल नंबरच्या ई-केवायसीसाठी प्राध्यापकाने एक ॲप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच १ लाख ३९ हजार खात्यातून लंपास झाल्याची घटना २० फेब्रुवारीस शहरात घडली. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
केज येथील समर्थ नगर भागात राहत असलेले शकील बशीर तांबोळी हे पुणे येथे एका कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वा ८९२१०५८४४५ या अनोळखी नंबर वरून फोन आला. त्याने सांगीतले की, तुमची मोबाईल सेवा चालू ठेवण्यासाठी प्ले स्टोअर्स मधून एक ॲप डाउनलोड करा व नंतर १० रु. चे रिचार्ज करा. तांबोळी यांनी मोबाईल नंबर बंद होईल याच्या भीतीने सांगितल्याप्रमाणे ॲप डाउनलोड केले.
मात्र, त्यानंतर तांबोळी यांच्या बँक खात्यातून पहिल्यांदा २५ हजार, दुसऱ्यांदा ४९ हजार ३५० आणि तिसऱ्या वेळी ६५ हजार रु. असे एकूण १ लाख ३९ हजार ३६५ रुपये लंपास झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रा. शकील बशीर तांबोळी यांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करत आहेत.