वॉटर ग्रेसचा प्रकल्प अखेर महापालिकेच्या ताब्यात; आता प्रकल्प मनपा स्वत: चालविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:49 IST2024-12-05T17:44:49+5:302024-12-05T17:49:20+5:30
प्रकल्प ताब्यात घेण्याची कार्यवाही आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

वॉटर ग्रेसचा प्रकल्प अखेर महापालिकेच्या ताब्यात; आता प्रकल्प मनपा स्वत: चालविणार
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारा पाटोदा भागातील प्रकल्प बुधवारी महापालिकेने ताब्यात घेतला. मागील काही दिवसांपासून कंत्राटदारविरुद्ध महापालिका असा ‘सामना’ सुरू होता. प्रशासक जी. श्रीकांत यांनी तत्काळ प्रकल्प ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपा अधिकाऱ्यांनी ताबा घेतला. गुरुवारपासून हा प्रकल्प मनपा स्वत: चालविणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
शहरातील शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये जमा होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याचे संकलन, प्रक्रिया करण्याचे काम मनपाने नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिले होते. २० वर्षांसाठी पालिकेने कंपनीबरोबर करार केला होता. करार संपल्यावर पुन्हा याच कंपनीला २० वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. परंतु, कंपनीच्या कामातील त्रुटी लक्षात आल्यावर प्रशासक जी. श्रीकांत यांनी निविदा काढण्याचे आदेश दिले. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यावर गोवा येथील बायोटेक वेस्ट लि. या कंपनीची निवड केली. या कंपनीला वॉटरग्रेसचा प्रकल्प हस्तांतरित करण्यात यावा असे आदेश दिले. पण, प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यास कंपनीच्या संचालकांनी टाळाटाळ केली, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीदेखील त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेने वॉटरग्रेसचा प्रकल्प ताब्यात घेतला. प्रकल्प ताब्यात घेण्याची कार्यवाही आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी दक्षता कक्षाचे प्रमुख एम. बी. काजी, मालमत्ता विभागाचे प्रमुख संजय चामले, यांत्रिकी विभागाचे वैभव गौरकर, बीओटी कक्षप्रमुख एस. एस. रामदासी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नांदवटे उपस्थित होते.
रीतसर पंचनामा...
डॉ. मंडलेचा यांनी सांगितले की, ‘वॉटरग्रेस कंपनीचे वैभव बोरा आणि प्रदीप गालफाडे यांनी प्रकल्प महापालिकेकडे रीतसर सोपविला. प्रकल्प ताब्यात घेताना पंचनामा करण्यात आला. दहा ते पंधरा साक्षीदार यावेळी उपस्थित होते. ताब्यात घेतलेला हा प्रकल्प उद्यापासून महापालिका चालवेल.’ प्रकल्प ताब्यात घेतल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांना देण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.