रेल्वेमंत्री म्हणतात २४, पण काम १६ बोगींच्या पीटलाइनचे, कामाला डिसेंबरची डेडलाइन
By संतोष हिरेमठ | Published: June 10, 2023 07:37 PM2023-06-10T19:37:07+5:302023-06-10T19:37:24+5:30
पीटलाइनमुळे शहरातून नव्या रेल्वेंना मिळेल ‘ग्रीन सिग्नल’
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर १६ बोगींची पीटलाइन होत आहे. मात्र, रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित केल्यास २४ बोगींची पीटलाइनची होऊ शकते. त्यातून नव्या सुविधा देता येतील, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते. परंतु, दक्षिण मध्य रेल्वेचा मालधक्का स्थलांतरित होऊ शकला नाही. त्यामुळे १६ बोगींच्या पीटलाइनचेच काम सुरू आहे.
पीटलाइनचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नव्या रेल्वे सुरू करण्यासाठी पीटलाइन महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे आगामी वर्षात शहरातून नव्या रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यातही पीटलाइनच्या कामात खंड पडू नये, यासाठी सध्या पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कधी दौलताबाद, कधी करमाड
मालधक्क्याचे कधी दौलताबाद तर कधी करमाड येथे स्थलांतर केले जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मालधक्क्याचे स्थलांतर झाले तर १६ बोगींची पीटलाइन पुढे २४ बोगींची होऊ शकते.
कामाची गती वाढावी
पीटलाइनच्या कामाची गती वाढविण्याची गरज आहे तसेच नियोजनानुसार डिसेंबरपूर्वी पीटलाइनचे काम पूर्ण केले पाहिजे.
- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
आश्वासनांची पूर्ती करावी
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी २४ बोगींच्या पीटलाइनचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे आणि २४ बोगींच्या दृष्टीने सुविधा उभारली पाहिजे.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक
... तर २४ बोगींची पीटलाइन
औरंगाबादेत १६ बोगींची पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, २४ बोगींच्या पीटलाइनची मागणी होत आहे. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित केल्यास जागा होऊ शकते. त्यातून नव्या सुविधा देता येतील. मालधक्का स्थलांतरित करावा की ठेवावा, यासंदर्भात उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना अश्विनी वैष्णव यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली.