मराठवाड्यात ४० दिवसच पडला पाऊस; २८ तालुक्यांवर दुष्काळी सावट, परतीच्या पावसावर मदार
By विकास राऊत | Published: October 2, 2023 01:10 PM2023-10-02T13:10:40+5:302023-10-02T13:12:58+5:30
१५ टक्के पावसाची तूट : हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा संपला
छत्रपती संभाजीनगर : हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा ३० सप्टेंबर रोजी संपला असून चार महिन्यांत मराठवाड्यात ८५.५ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोचा परिणाम मराठवाड्यातील पावसावर झाला आहे. आठपैकी दोन जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला तर उर्वरित सहा जिल्ह्यांत सामान्यत: सरासरीच्या आसपास पाऊस झाला असून विभागातील ७६ पैकी २८ तालुक्यांत ७५ टक्क्यांच्या आत पाऊस झाला आहे. परिणामी, या तालुक्यांवर दुष्काळी सावट आहे.
मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. ६७९.५ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी ५८१.५ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी ११३ टक्के (७६९.७ मि.मी.) पाऊस झाला होता. परतीच्या पावसाचा काळ ४ ऑक्टोबरनंतर सुरू होणार, असे हवामान खात्याचे भाकीत आहे. या काळात पावसाने दमदार हजेरी लावली तर दुष्काळी संकट असलेल्या तालुक्यांची वार्षिक सरासरी पूर्ण होऊ शकेल. विभागातील नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त तर हिंगोली जिल्ह्यात ९३ टक्के पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यांना दमदार पावसाची गरज आहे.
हे तालुके दुष्काळाच्या संकटात....
छत्रपती संभाजीनगर, मंठा, घनसावंगी, बीड, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, वडवणी, लातूर, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, शिरूर-अनंतमाळ, जळकोट, धाराशिव, तुळजापूर, भूम, कळंब, वाशी, कंधार, परभणी, पाथरी, जिंतूर, पूर्णा, सोनपेठ, मानवत हे तालुके अजूनही दुष्काळाच्या संकटात आहेत.
मराठवाड्यातील जिल्हानिहाय पावसाची तूट
जिल्हा......................पावसाची तूट
छत्रपती संभाजीनगर....१० टक्के
जालना............२० टक्के
बीड...........२१ टक्के
लातूर..........२८ टक्के
धाराशिव............२९ टक्के
परभणी...........३२ टक्के
नांदेड...........८ टक्के जास्त
हिंगोली...........७ टक्के
एकूण............ १५ टक्के
१२२ पैकी सरासरी ४० दिवसच पडला पाऊस
मराठवाड्यावर येणाऱ्या काळात दुष्काळाचे सावट आहे. जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत १२२ दिवसांत सरासरी ४० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला. ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसाने विभागाला थोडाफार दिलासा मिळाला.
प्रमुख पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम
कापूस, मका, सोयाबीनचे लागवड क्षेत्र अंदाजे ४० लाख हेक्टर असून कमी पावसामुळे या पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.
मोठ्या धरणातील पाणीसाठा
प्रकल्प..........२०२२.......२०२३
जायकवाडी.... ९९ टक्के....४५ टक्के
निम्म दुधना.....७५ टक्के.....२८ टक्के
येलदरी........१०० टक्के......६२ टक्के
सिध्देश्वर....९६ टक्के.......९७ टक्के
माजलगाव....९६ टक्के......१२ टक्के
मांजरा.....६४ टक्के.......२८ टक्के
पेनगंगा....९९ टक्के.......८३ टक्के
मानार....१०० टक्के.......७२ टक्के
निम्न तेरणा.....९८ टक्के......२५ टक्के
विष्णुपुरी......९३ टक्के......१०० टक्के
सिना कोळेगाव....१०० टक्के....०० टक्के
एकूण........९७ टक्के.........५३ टक्के