नातेवाईक बोलून गेला अन् दोन वर्षांपूर्वीची घरफोडी उघडकीस, चोराला बीडमधून अटक
By सुमित डोळे | Published: January 13, 2024 03:52 PM2024-01-13T15:52:58+5:302024-01-13T15:53:40+5:30
आशा मावळलेल्या तक्रारदाराला सोने परत मिळाले
छत्रपती संभाजीनगर : बीडच्या एका गुन्हेगाराने शहरात आल्यानंतर केलेल्या घरफोडीचा उल्लेख त्याच्या एका नातेवाइकाने सहज मित्राकडे गेला. ही बाब सिटी चौक पोलिसांपर्यंत पोहोचली अन् तब्बल २ वर्षे ५ महिन्यांनी फाजलपुऱ्यात झालेली घरफोडी उघडकीस आली. यात पोलिसांनी बीडहून गोपी किशन कांबळे (रा. नागोबा गल्ली, बीड) याला अटक केली. त्याने तेव्हा चोरलेले २४.८७ ग्रॅम सोने सराफाकडून जप्त करीत त्यालाही आरोपी केले.
फाजलपुऱ्यात राहणाऱ्या किशोर किसन खाजेकर यांच्या घरी ५ ऑगस्ट २०२१ रोजी चोरी झाली होती. चोराने सोने, दोन माेबाइल व १० हजारांची रोख रक्कम चोरली होती. तत्कालीन सिटी चौक पोलिस अधिकाऱ्यांना चोराचा शोध लावता आला नाही. सिटी चौक पोलिस ठाण्याचे अंमलदार उपनिरीक्षक अर्जुन कदम, मुनीर पठाण यांना या घरफोडीतील आरोपी बीडमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. निरीक्षक निर्मला परदेशी यांनी त्यांना कारवाईच्या सूचना केल्या. कदम, पठाण, अंमलदार राजेंद्र साळुंके, रोहिदास खैरनार यांनी तत्काळ बीड गाठले. बेसावध गोपी घरात निवांत बसलेला असतानाच त्याला उचलून शहरात आणले.
असा झाला भांडाफोड
गोपी हा बीडमधील कुख्यात गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला २०२१ मध्ये बीडमधून तडीपार करण्यात आले. तेव्हा तो शहरात सिटी चौक परिसरात बहिणीकडे आला. त्याचदरम्यान त्याने खाजेकर यांचे घर फोडले. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो परत बीडला गेला. त्याने येथे घरफोडी केल्याचे एका नातेवाइकाला कळाले होते. आठ दिवसांपूर्वी तो बोलता बोलता एका व्यक्तीकडे ही बाब बोलून गेला आणि गोपीचा अनपेक्षित भंडाफोड झाला. त्याने सोने विकलेल्या सराफाकडून ते जप्त करण्यात आले.