छत्रपती संभाजीनगरवासी करतात दररोज १०० टन खाद्यतेल फस्त !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:50 IST2025-03-07T17:45:16+5:302025-03-07T17:50:01+5:30
खाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये.

छत्रपती संभाजीनगरवासी करतात दररोज १०० टन खाद्यतेल फस्त !
छत्रपती संभाजीनगर : देशातील नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. निरोगी आयुष्यासाठी तेलाचा अतिवापर टाळा असा कानमंत्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर येथे दररोज १०० टन खाद्यतेलाची विक्री होते, आता बोला.
१८ लाख लोक दररोज खातात १०० टन खाद्यतेल
छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. पॅकिंग व सुटे खाद्यतेल मिळून दररोज अंदाजे १०० टन खाद्यतेलाची उलाढाल होते. प्रतिव्यक्ती सुमारे ७० ते ८० ग्रॅम तेलाचे दररोज सेवन करतो, असा याचा अर्थ होतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, आहारतज्ज्ञांच्या मते, ४० वर्षांवरील प्रतिव्यक्ती दररोज १५ ते २० एमएल तेल, तर ४० वर्षांखालील व्यक्तींनी २० ते २५ एमएल तेल दररोज खाल्ले पाहिजे.
शहरवासीयांना आवडते सोयाबीन तेल
करडी तेल व शेंगदाणा तेलाचे भाव गगनाला भिडल्याने शहरवासी मागील काही महिन्यांपासून सोयाबीन तेलाला पहिली पसंती देत आहेत. १०० टन पैकी ६० ते ७० टन सोयाबीन तेल विकते. २० ते ३० टन सूर्यफूल तेल विकते, तर उर्वरित १० टन तेलामध्ये करडीतेल, शेंगदाणा, सरकी, पामतेल, राईस ब्रॅन तेल, सरसो तेलाचा समावेश होतो. यात ५० टक्के पॅकिंगचे, तर ५० टक्के सुट्टे तेल विकले जात असल्याची माहिती होलसेल व्यापारी राकेश पांडे यांनी दिली.
एका कुटुंबाला महिन्याला किती लागते तेल ?
पती-पत्नी व त्यांचे दोन मुले, अशा चार जणांच्या कुटुंबाला महिन्याकाठी किती तेल लागते. याविषयी माहिती घेतली असता. किराणा दुकानात येणाऱ्या यादीवरून सुमारे ४.५० ते ५ लिटर खाद्यतेल खरेदी करीत असल्याचे निदर्शनात आले. अनिल पवार या व्यक्तीने सांगितले की, आम्ही दोघे व आमच्या दोन मुली असे आमचे कुटुंब आहे. दर महिन्याला आम्ही सोयाबीन किंवा सूर्यफुल तेलाची पाच लिटरची कॅन लागते.
अदलूनबदलून तेल खरेदी करा
खाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये. प्रत्येक तेलाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. उष्मांक वेगवेगळा असतो. यामुळे दर महिन्याला एकच तेल खरेदी न करता. प्रत्येक महिन्याला खाद्यतेल बदलून वापरत जा. एका महिन्यात सोयाबीन, तर दुसऱ्या महिन्यात सूर्यफूल, तर तिसऱ्या महिन्यात शेंगदाणा तेल असे बदलून वापरत जावे, मात्र तेलाचे प्रमाण मात्र नक्की पाळावे.
अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ