एम.एड. अभ्यासक्रमांच्या २० विद्यार्थ्यांचा निकाल तीन महिन्यांपासून रखडला
By राम शिनगारे | Published: November 3, 2023 01:18 PM2023-11-03T13:18:43+5:302023-11-03T13:19:36+5:30
महाविद्यालयांनी संपूर्ण शंका दूर केल्यानंतरही निकाल जाहीर होईना
छत्रपती संभाजीनगर : शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम.एड. अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील आठ आणि जालना येथील महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांचा निकाल तीन महिन्यांपासून विद्यापीठाकडून रखडला आहे. संबंधित महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही निकाल जाहीर केला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित शासकीय अध्यापक महाविद्यालय, जालना येथील सी.पी. कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयातील एम.एड.च्या विद्यार्थ्यांनी एप्रिल-मे महिन्यात दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रातील परीक्षा दिल्या होत्या. त्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील आठ आणि सी.पी. कॉलेजमधील १२ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले होते. शासकीय अध्यापक महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचे व्हायवाअंतर्गत गुण ऑनलाइन आणि ऑफलाइनसुद्धा वेळेत दाखल केले होते. मात्र, परीक्षा विभागातून संबंधित विद्यार्थ्यांचे मार्कच महाविद्यालयाने दिले नाहीत, या सबबीखाली आठ विद्यार्थ्यांचा निकाल नापास असा दर्शविण्यात आला होता. मात्र, संबंधितांचे व्हायवाचे मार्क पूर्णपणे विद्यापीठाकडे सुपुर्द केले होते. त्यानंतरही निकाल जाहीर झाला नाही. याविषयी महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठातील परीक्षा विभागासोबत पत्रव्यवहार केला. अनेकवेळा प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन चर्चा केली. तरीही तीन महिन्यांपासून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. अशीच परिस्थिती जालना येथील सी.पी. कॉलेज ऑफ एज्युकेशनची बनलेली आहे. त्याठिकाणचे १२ विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.
राखीव निकालाचा आढावा
शासकीय अध्यापक महाविद्यालायातील आठ विद्यार्थ्यांच्या राखीव निकालाचा बुधवारी आढावा घेतला. त्याचा प्रश्न निकाली काढला आहे. गुरुवारी जालना येथील महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल.
- डॉ. भारती गवळी,संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ