जलवाहिनीवरील रस्त्याचा वापर होणार नाही; मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न, पाणी कधी देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:12 IST2025-01-11T14:11:40+5:302025-01-11T14:12:36+5:30
नॅशनल हायवेने रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी स्वतंत्रपणे भूसंपादन करावे, असा निर्णय घेण्यात आला.

जलवाहिनीवरील रस्त्याचा वापर होणार नाही; मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न, पाणी कधी देणार?
छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर नॅशनल हायवेने चक्क रस्ता तयार केला. ‘लोकमत’ने चूक कुणाची, शिक्षा कुणाला? या अंतर्गत वृत्त मालिका प्रकाशित केली. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. जलवाहिनीवर रस्ता तयार केला असला, तरी वाहतुकीसाठी त्याचा वापर अजिबात करता येणार नाही. नॅशनल हायवेने रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी स्वतंत्रपणे भूसंपादन करावे, असा निर्णय घेण्यात आला. मार्चपूर्वी शहरात किमान ३५० एमएलडी पाणी येईल, असा विश्वास मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. आतापर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले. त्यावर १२ किमीपर्यंत नॅशनल हायवेने रस्ता तयार केला. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आक्षेप घेतला. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरला. मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रस्त्याची पाहणीही केली.
मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न; पाणी कधी देणार?
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचा आढावा घेतला. त्यांनी पहिला प्रश्न अधिकाऱ्यांना केला की, छत्रपती संभाजीनगरला पाणी कधी देणार? जलवाहिनीवर रस्ता तयार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जलवाहिनीचे काम थांबवू नका, असे निर्देश त्यांनी दिले. मार्चपूर्वी पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. जलवाहिनीवर तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. जलवाहिनीच्या बाजूला लोखंडी बॅरिकेट्स राहतील. रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यासदेखील मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे.
दररोज ३५० एमएलडी पाणी
नवीन पाणीपुरवठा योजनेत शहराला रोज २०० एमएलडी पाणी मिळेल. ९०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी आणि जुन्या १२०० मिमीच्या जलवाहिनीतून ८० एमएलडी पाणी मिळाले तर शहराला ३०० वर एमएलडी पाणी मिळेल. रोज पाणीपुरवठा होऊ शकेल. यंदा उन्हाळ्यात शहरवासीयांना अजिबात त्रास होणार नाही, असे प्रशासक म्हणाले.
नवीन जलकुंभांचा वापर
मजीप्राने मनपाला काही जलकुंभ दिले. हनुमान टेकडी, हिमायतबाग, शिवाजी ग्राऊंड, टीव्ही सेंटर येथून पाणी देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना प्रेशरने पाणी मिळू लागले आहे. पाणीपुरवठ्याचे टप्पे कमी झाले. काही जलकुंभांवरील भार कमी झाल्याचे सांगण्यात आले.