ड्रेनेज चोकअप शोधणार रोबोट! नवीन तंत्रज्ञानाची छत्रपती संभाजीनगर मनपाकडून चाचपणी
By मुजीब देवणीकर | Published: September 7, 2024 01:15 PM2024-09-07T13:15:44+5:302024-09-07T13:15:52+5:30
दिल्ली येथील आणखी एका खासगी कंपनीने अडीच कोटींचे वाहनावरील मशिन विकसित केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील ड्रेनेज लाइन तीन दशकांपूर्वी टाकलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात चोकअप झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानही आता यासंदर्भात बरेच विकसित झाले आहे. एका खासगी कंपनीने शुक्रवारी मनपा अधिकाऱ्यांना रोबोट चोकअप कशा पद्धतीने शोधून देतो, याचे प्रात्यक्षिक दाखविले.
काही वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर होत होता. अलीकडेच ड्रेनेजच्या चेंबरमध्ये विषारी वायूमुळे गुदमरून मजुरांचा मृत्यू झाला. या घटना टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांकडून चोकअप काढण्यावर बंदी घातली. मागील काही वर्षांपासून विविध तंत्रज्ञानांच्या मदतीने चोकअप काढले जाते. एका खासगी कंपनीने चोकअप नेमके कोठे आहे, त्याचे थर किती लांबी किती, जमिनीपासून किती खोल, याची इंत्यभूत माहिती देणारे रोबोट विकसित केले. शुक्रवारी सकाळी कंपनीने जुनाबाजार-हेड पोस्ट ऑफीस रोडवर प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह कार्यकारी अभियंता संजय कोंबडे, उपअभियंता संजय चामले आदींची उपस्थिती होती. रोबोट मेनहोलमध्ये सोडल्यानंतर काही क्षणांत जिथे चोकअप होते तेथे पोहोचला. मातीचे किती थर आहे, त्यांची जाडी लांबी रुंदी बाहेर स्क्रिनवर दिली. खोदकाम करायचे असेल, तर जमिनीपासून आत खोली किती हे सुद्धा नमूद होते.
पाण्याचा प्रेशर मारून चाेकअप काढते
दिल्ली येथील आणखी एका खासगी कंपनीने अडीच कोटींचे वाहनावरील मशिन विकसित केले आहे. राज्यातील काही महापालिका चोकअप काढण्यासाठी या मशिनचा वापर करीत आहेत. पाण्याच्या प्रेशरद्वारे चोकअप काढते. गाळ-मलबाही ही मशिन काढून देते. कंपनीच्या प्रतिनिधींनी याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांना दिली. त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी वाहन शहरात आणावे, अशी सूचना करण्यात आली.
........