गुड न्यूज! ‘सखी निवास’ योजनेतून नोकरदार महिलांची आता राहण्याची चिंता मिटणार!

By विजय सरवदे | Published: October 6, 2023 05:23 PM2023-10-06T17:23:07+5:302023-10-06T17:23:36+5:30

लवकरच जिल्हानिहाय स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा

The 'Sakhi Niwas' scheme will solve the worries of working women residence! | गुड न्यूज! ‘सखी निवास’ योजनेतून नोकरदार महिलांची आता राहण्याची चिंता मिटणार!

गुड न्यूज! ‘सखी निवास’ योजनेतून नोकरदार महिलांची आता राहण्याची चिंता मिटणार!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नोकरी करणाऱ्या एकल महिलांना मोठ्या शहरात सुरक्षित निवारा मिळणे अवघड असते. अनेकदा किरायाने खोली किंवा घरही मिळते, पण एकट्या महिलेला राहणे शक्य होत नाही. यावर केंद्र सरकारने उत्तम पर्याय शोधला आहे. ‘सखी निवास’ या योजनेंतर्गत नोकरी करणाऱ्या महिला तसेच प्रशिक्षणार्थी महिलांना प्रवेश मिळणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ६ संस्थांनी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पुणे मुख्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ अंतर्गत ‘सामर्थ्य’ या उपयोजनेच्या माध्यमातून ‘सखी निवास’ ही योजना कार्यान्वित करण्यासाठी अर्थसाहाय्य मिळणार आहे. यात केंद्राचा वाटा ६० टक्के, तर राज्याचा वाटा ४० टक्के असेल. जिल्हानिहाय एका वसतिगृह चालविले जाणार आहे.

काय आहे सखी निवास योजना?
नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी राहण्याची सुरक्षित व्यवस्था व्हावी म्हणून हॉस्टेल्सच्या धर्तीवर ‘सखी निवास’ योजना राबविली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली खासगी संस्थेच्या माध्यमातून ही सुविधा लवकरच सुरू होईल.

प्रस्ताव मागवले
महिला व बाल विकास विभागाने यासंदर्भात खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. प्राप्त ६ प्रस्ताव पुणे येथील या विभागाच्या मुख्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.

नोकरी करणाऱ्या महिलांची राहण्याची सोय
घरापासून दूर शहरांमध्ये अनेक महिला नोकरी करतात. त्यांना सुरक्षित निवारा मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘सखी निवास’ ही योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना महिला वसतिगृह या नावाने ओळखली जात होती.

कोणाला राहता येणार?
या योजनेंतर्गत नोकरी करणाऱ्या महिलांचे मासिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त नसावे. एखादे प्रशिक्षण घेत असलेल्या महिलेला देखील निवासासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, नोकरी करणाऱ्या महिलेसोबत १८ वर्षांपर्यंतची मुलगी, १२ वर्षांपर्यंतचा मुलगादेखील राहू शकतो. या योजनेचा लाभ अविवाहित, विवाहित, विधवा, विभक्त, घटस्फोटित महिला घेऊ शकतात.

महिलांसाठी लाभदायक
मागील चार महिन्यांपूर्वी सखी निवास या योजनेसाठी खासगी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ते पुणे येथील मुख्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. शहराच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या एकल महिला अथवा अविवाहित, विधवा, विभक्त, घटस्फोटित महिलांसाठी लाभदायक ठरेल.- महिला व बालकल्याण अधिकारी

Web Title: The 'Sakhi Niwas' scheme will solve the worries of working women residence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.