Video: विजेसाठी सरपंच नागडा झाला, गावासाठी ट्रॉन्सफार्मर घेऊनच आला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 08:03 PM2023-01-02T20:03:33+5:302023-01-02T20:04:38+5:30
सरपंचाच्या अनोख्या आंदोलनाने एका दिवसांत झाले काम
बोरगाव अर्ज (औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावातील दोन ट्रान्सफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत होते. यातील एक ट्रान्सफार्मर अनेक दिवसांपासून बंद होते. तर दुसरे चार दिवसांपूर्वी जळाले होते. मागणी करूनही दखल घेत नसल्याने शेवटी आज गावचे नवनिर्वाचित सरपंच मंगेश साबळे यांनी नागडे होऊन सरळ आळंद येथील महावितरण कार्यालय गाठले. त्यांचा हा अवतार पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यामुळे तत्काळ प्रशासन यंत्रणा हलली व त्यानंतर दुपारपर्यंत दोन्ही ट्रान्सफार्मर गावात हजर झाले. जेथे महिने लागतात, तेथे एका दिवसांतच महावितरणने ट्रान्सफार्मर दिल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
गेवराई पायगा येथील एक ट्रान्सफार्मर पंधरा दिवसांपासून बंद होते. यामुळे पाणी असूनही शेतकरी हवालदिल झाले होते. ट्रान्सफार्मर लागत असेल तर पहिले वीजबिल भरा, अशी अट महावितरण कार्यालयाने घातली होती. रब्बीची पिके डोळ्यासमोर सुकत असल्याने शेतकरी अधिकाऱ्यांना गयावया करीत होते. त्यात पुन्हा गावातील पाणीपुरवठ्यासाठी असलेला ट्रान्सफार्मर चार दिवसांपूर्वीच जळाला. यामुळे ग्रामस्थ पाण्यावाचून कासावीस झाले. यासाठी प्रयत्न करूनही महावितरणचे अधिकारी ऐकत नव्हते. गावात नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे काँग्रेसचे मंगेश साबळे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर वीजबिल भरण्यास सांगितले. अधिकारी सरळ पद्धतीने ऐकत नसल्याचे पाहून त्यांनी अर्धनग्न होत आळंद महावितरण कार्यालय गाठले. कनिष्ठ अभियंता कडूबा काळे यांच्या दालनात ठिय्या दिला. चार वाजेपर्यंत ट्रान्सफार्मर मिळालेच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या आंदोलनाचा यापूर्वीचा अनुभव माहिती असल्याने काळे यांनी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून ट्रान्सफार्मर देण्याची मागणी केली. यानंतर यंत्रणा वेगाने हलली व दुपारपर्यंत गेवराई पायगा गावात दोन्ही ट्रान्सफार्मर हजर झाले. सायंकाळपर्यंत ते बसविण्याचे काम वेगाने सुरू होते. मंगेश साबळे यांच्या या आंदोलनाची परिसरात दिवसभर चर्चा होत होती. सरपंच झाल्यानंतर साबळे यांचे हे पहिलेच आंदोलन होते.
वीजबिल लागत असेल, तर सर्वच दुरुस्त्या करा
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आंदोलन केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वीजबिल भरण्याची मागणी केली. मात्र प्रथम ट्रान्सफार्मर द्या, तसेच परिसरात सडलेले विद्युत पोल, लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रॉन्सफार्मर याची संपूर्ण दुरुस्ती करा, तरच आम्ही वीजबिल भरू, असे साबळे यांनी सांगितले.