स्वच्छता मोहीमेची व्याप्ती वाढली; ग्रामीण भागातही घरासमोर येऊन कचरा गोळा केला जाणार
By विजय सरवदे | Published: January 18, 2024 06:50 PM2024-01-18T18:50:32+5:302024-01-18T18:50:53+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींत राबविली जातेय स्वच्छता मोहीम
छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये ही कामे केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सरत्या वर्षात जिल्ह्यातील ६२६ गावे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवडण्यात आली होती. यंदा जिल्ह्यातील सर्व गावांची निवड करण्यात आली आहे.
अस्वच्छता हेच आरोग्य बाधित होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे गावांमध्ये श्वास्वत स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. केवळ कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन म्हणजेच स्वच्छता नाही, तर ग्रामीण नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणीही देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून गावात घनकचरा व्यवस्थापनामध्ये ‘सेग्रीगेशन शेड’ म्हणजेच ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी शेड उभारण्यात येत आहे. कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड व अन्य वस्तू वेगळे करून सुका कचऱ्यावर खत प्रक्रिया केली जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण काय आहे?
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण म्हणजे प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर व्हावे, यासाठी वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, गावातील इतर सरकारी- निमसरकारी कार्यालये तसेच शाळा, अंगणवाडीमध्ये शौचालयाची व्यवस्था असावी व त्याचा वापर व्हावा. पिण्याचे शुद्ध पाणी असावे. गावाचा परिसर स्वच्छ सुंदर असावा. रस्त्याच्या दुतर्फा तसेच प्रत्येक घरासमोर एक तरी झाड असावे, म्हणजेच गावात सर्वांगीण स्वच्छता असावी अर्थातच दृश्यमान स्वच्छता असावी.
कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती?
तालुका- गावे- ग्रामपंचायत
छत्रपती संभाजीनगर -१७७-११५
फुलंब्री- ९३ - ७२
सिल्लोड- १२४- १०४,
सोयगाव- ७३- ४६,
कन्नड- २००- १३८
खुलताबाद- ७३- ३९
वैजापूर - १६४- १३५
गंगापूर- २१०- १११
पैठण- १८५- ११०
बचत गट गोळा करणार कचरा
प्रत्येक गावातील घनकचरा एकत्र करून तो व्यवस्थापन प्रकल्पामध्ये जमा केला जाणार आहे. त्यासाठी बचत गट तसेच ग्रामपंचायतीला विक्रीतून उत्पन्न होईल या उद्देशाने बचत गट कचरा विलगीकरण करणार आहे.
ओला, सुका वर्गीकरण करून खतनिर्मिती
प्रत्येक गावातून ओला कचरा, सुका कचरा असे वर्गीकरण करून घंटागाडीच्या मार्फत घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी आणला जाईल. त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने खतनिर्मिती करून विक्री केली जाणार आहे.
गावातील स्वच्छता टिकून राहील
प्रत्येक गावात घनकचऱ्याचे शेड उभारण्यात येत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात मार्किंगचे काम सुरू असून काही ठिकाणी शेड तयार झालेले आहेत, तर काही ग्रामपंचायतींनी ट्राय सायकल, घंटागाडी तसेच इतर वाहनांचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. घरातील कचरा देताना तो ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच तो घंटा गाडीवाल्याकडे द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावातील स्वच्छता टिकून राहील.
- राजेंद्र देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.