फरार आरोपीच्या शोधात बारमध्ये गेलेल्या दोन पोलिसांना तिघे भिडले, केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 07:16 PM2022-08-31T19:16:24+5:302022-08-31T19:16:54+5:30
अजिंठा येथील घटना; गुन्हा दाखल झालेल्या तिघांची हर्सूल कारागृहात रवानगी
सिल्लोड (जि. औरंगाबाद) : एका जुन्या गुन्ह्यातील आरोपी बियर बारमध्ये आला असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या शोधासाठी गेलेल्या साध्या वेशातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तिघांनी ‘फिल्मी स्टाईल’ने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अजिंठा येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अजिंठा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल ईश्वर शाळिग्राम पाटील व अण्णासाहेब गवळी या दोन कर्मचाऱ्यांना सोयगाव तालुक्यातील एक फरार आरोपी बियर बारमध्ये आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संबंधित बियर बारमध्ये साध्या वेशात गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी वेटरला आवाज दिला आणि हवा असलेल्या आरोपींबाबत चौकशी केली शिवाय आत जाऊन आरोपीची खात्री केली. मात्र, तेथे तो आरोपी पोलिसांना सापडला नाही.
यावेळी शेजारील एका टेबलवर शेख मुख्तार शेख लतीफ, शेख मोहसीन शेख लतीफ, शेख हकीम शेख हबीब तिघे (रा.अजिंठा) हे दारू पित बसले होते. त्यांची चौकशी केल्याने त्यांना राग आला व त्यांनी मागे पुढे न बघता दोन्ही पोलिसांना ‘फिल्मी स्टाईल’ने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात पोलीस कर्मचारी पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत जखमी पोलीस कर्मचारी ईश्वर शाळीग्राम पाटील यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी वरील तिघा आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी तिन्ही आरोपीना सिल्लोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उलटसुलट चर्चा
भरदुपारी पोलीस बारमध्ये गेलेच कशाला? आरोपींनी पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याइतके काय घडले होते? कोण पिलेले होते अन् कोण नाही ? यात चूक कोणाची ? असे अनेक प्रश्न येथील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहेत. याबाबत उलटसुलट चर्चा सोमवारपासून सुरू आहे.