"छत्रपती संभाजीनगरची जागा आमचीच; सर्वेक्षणाच्या जोरावर उमेदवार ठरवला जात नाही"
By बापू सोळुंके | Published: April 3, 2024 01:26 PM2024-04-03T13:26:47+5:302024-04-03T13:27:50+5:30
लोकसभेच्या जागांवरून महायुतीत कोणतेही भांडण नाही: संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांकडून केले जाणारे सर्वेक्षणाकडे केवळ गाईडलाईन्स म्हणून पाहिले जाते. सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार ठरला जात नसल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नाशिक, औरंगाबाद लोकसभेच्या सीट आमच्याच असल्याने येथे शिवसेनेचे उमेदवार असतील, असा दावाही त्यांनी केला.
आ. शिरसाट म्हणाले की, शिवसेनेच्या जागेवर भाजप, राष्ट्रवादीकडून दावा सांगितला जात आहे. हिंगोली आणि बुलढाण्याचा उमेदवार बदलण्यासाठी भाजपकडून दबाव टाकला जात आहे, हे का सुरू झाले, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, आमच्यात भांडण आहे, असा अंदाज लावू नये. हिंगोलीचा उमेदवार बदलायचा अथवा नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. शिंदे सेनेचे उदय सामंत त्यांच्या बंधूंसाठी ज्या मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत, तेथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचार सुरू केला; याकडे लक्ष वेधले असता आ. शिरसाट म्हणाले की, राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली अथवा नाही हे माहिती नाही. सिंधुदुर्गच्या जागेबाबत शिंदे, फडणवीस निर्णय घेतील, तो मान्य असेल. भाजपमुळे मराठवाड्यात अडचणी निर्माण झाल्या का, असे विचारले असता आ. शिरसाट म्हणाले की, महायुतीच्या सर्व नेत्यांनी ठरवून परभणीची जागा जानकरांना दिली आहे. हिंगोली आमची आहे. संभाजीनगर पारंपरिक असल्याने आम्ही लढवणार, यामुळे आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रश्नच नाही. नाशिकची जागा गोडसे यांनी दोन वेळेस जिंकली आहे. यामुळे नाशिकच्या जागेवर आज आणि उद्याही आम्ही आग्रही आहोत. लवकरच या सीटचा निर्णय होईल.
अंबादास दानवे यांना बोलू द्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुलाची उमेदवारी घोषित करू शकले नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता आ. शिरसाट खोचकपणे म्हणाले की, आ. दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत, यामुळे सध्या त्यांना काही दिवस बोलू द्या.