शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सात तोळ्यांचा दागिना दुचाकीस्वारांनी हिसकावला
By राम शिनगारे | Published: April 27, 2023 08:21 PM2023-04-27T20:21:04+5:302023-04-27T20:21:51+5:30
सिडको एन १ मधील घटना; एम. सिडकोत गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : जेवण करून रस्त्यावर वॉकिंगला आलेल्या महिलेच्या गळ्यातील सात तोळे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील दोन चोरट्यांनी हिसकावले. ही घटना एन १, सिडको भागातील काळा गणपती रोडवर बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक गाैतम पातारे यांनी दिली.
अंजली शैलेंद्र गौड (रा. सिडको, एन १) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या नेहमीप्रमाणे वॉकिंग करीत होत्या. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने अंजली यांच्या गळ्यातील साडेआठ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. अंजली यांनी मंगळसूत्राचा पुढील भाग पकडल्यामुळे मंगळसूत्राच्या दोन वाट्यांचा मुख्य भाग त्यांच्या हातात राहिला. उर्वरित दोन पदरी सोन्याची चेन त्या इसमाने हिसकावून पोबारा केला. या घटनेत एकूण ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सात तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीला गेले. घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, एम. सिडकोचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक प्रतिभा आबूज, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अमोल म्हस्के, अजित दगडखैर यांच्यासह इतरांनी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहेत.