रेणुकादेवी शरद कारखान्याची सूत्रे पुन्हा संदीपान भुमरेंच्या हातात; १४ संचालक बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:21 PM2023-06-14T19:21:21+5:302023-06-14T19:22:08+5:30
रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणूक; मविआच्या १० उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध
पैठण: उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या निर्णयास आव्हान देणारा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याने रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी याबाबत बुधवारी अधिकृत घोषणा केली आहे.
रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भरलेले महाविकास आघाडी गटाचे १० उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी अवैध ठरविले होते. या निर्णया विरोधात साखर आयुक्तांकडे या दहा उमेदवारांनी दाद मागितली तेथेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरविण्यात आला. यामुळे न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पुढे सरकल्याने न्यायालय यात हस्तक्षेप करू शकत नाही असे मत मांडून उमेदवारांचा अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. यामुळे १४ संचालकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नितीन तांबे, ब्रम्हदेव नरके व भिमराव वाकडे (टाकळी अंबड गट). अक्षय डुकरे, दिलीप बोडखे व अफसर शेख ( विहामांडवा गट). सुभाष गोजरे, अमोल थोरे, नंदू पठाडे ( चौंढाळा गट). सुभाष चावरे, भरत तवार व विलास भुमरे ( कडेठाण गट). सहकारी संस्था मतदार संघातून राजूनाना भुमरे व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून कल्याण धायकर हे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. दरम्यान हे सर्व उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे आहेत. १४ संचालक बिनविरोध झाल्याने आता सात संचालकाच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहे. दहा उमेदवार अवैध ठरल्यानंतरही निवडणूक ताकतीने लढू असे महाविकास आघाडीचे दत्ता गोर्डे यांनी सांगितले. रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या सात संचालकाच्या निवडीसाठी दि २५ जून रोजी मतदान घेण्यात येणार असून १४ उमेदवार रिंगणात आहेत.