क्रांती चौक घोषणांनी दणाणला; शिंदे गट-ठाकरे गट भिडणार तोच पोलिसांनी केली 'एंट्री'
By विकास राऊत | Published: January 11, 2024 02:29 PM2024-01-11T14:29:31+5:302024-01-11T14:35:08+5:30
दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेची असल्याचा व १६ आमदारांना पात्र केल्याच्या निकालाचे शहरात पडसाद उमटले. क्रांती चौकात रात्री आठ वाजेच्या सुमारास शिंदे गटाचा जल्लोष आणि ठाकरे गटाचे निषेधाचे चित्र पाहायला मिळाले. दोन्ही गट आमने-सामने येऊन भिडणार तोच पोलिसांनी मध्यस्थी करीत ठाकरे गट युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे तणाव निवळला व पुढील अनर्थ टळला.
शिंदे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे होर्डिंग्ज हाती घेत घोषणाबाजीसह जल्लोष केला तर ठाकरे गट युवासेनेने आम्ही सदैव ठाकरेंसोबत असे बॅनर झळकावून शिंदे गटाच्या विरोधात घोषणा दिल्या. दोन्ही गटांतील हे द्वंद्व लवकर संपेल, असे काही वाटत नव्हते. एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीमुळे दोन्हीकडील कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर येऊन राडा होण्याचे चित्र होते. पोलिसांनी तातडीने धाव घेत ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, ऋषी खैरे, धर्मराज दानवे, सागर खरगे, अजय चोपडे, सागर वाघचौरे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांना ताब्यात घेतले. शिंदे गटाचे आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शिल्पाराणी वाडकर आदींनी भगवे ध्वज हाती घेत जल्लोष केला.
युवा सैनिकांनी लढविला किल्ला
शिवसेना ठाकरे गटातील फादर बॉडीतील एखाद-दुसरा वगळता कुणीही शिंदे गटासमोर आले नाही. युवा सेनेने शिंदे यांच्या नेतृत्वात तातडीने क्रांती चौकात शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
आम्ही सत्यासोबतच
आज खोटेपणाचा विजय झाला असला तरी तो खूप काळ टिकणार नाही. आम्ही खरे आणि सत्य आहोत. याला काळासह जनतेच्या दरबारात उत्तर नक्की मिळेल.
-हनुमान शिंदे, जिल्हाप्रमुख ठाकरे गट, युवासेना
शिवसैनिकांच्या मनातील निकाल
शिवसैनिकांनी राज्यभर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यांच्या मनातील निकाल लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत राहून हा निकाल आहे.
-प्रदीप जैस्वाल, आमदार, शिंदे गट