बालेकिल्ल्यात घुसून धडकी भरवणाऱ्या ‘राज’सभेने उभी केली शिवसेनेसमोर आव्हाने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 01:30 PM2022-05-03T13:30:42+5:302022-05-03T13:35:01+5:30
या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी होत आहे.
- स.सो. खंडाळकर
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून शिवसेनेला धडकी भरवणारी सभा असंच वर्णन ‘राज’सभेचं करावं लागेल. सभेमुळे निर्माण झालेलं वातावरण पलटवून लावण्याचं मोठं आव्हान स्थानिक शिवसेनेसमोर नक्कीच आहे.
ना नकला ... ना मिमिक्री.....
पोलिसांनी १६ अटी लादल्याचा परिणाम राज ठाकरे यांच्या भाषणातून जाणवत होता. त्यामुळेच त्यांनी ना कुणाच्या नकला केल्या, ना कुणाचे आवाज काढले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात येऊन राज ठाकरे यांनी ना शिवसेनेचे नाव घेतले, ना उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली. शरद पवार यांना मात्र त्यांनी ‘टार्गेट’ केले. त्यांच्यावर थेट जातीयवादचा आरोप करीत शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच ॲलर्जी असल्याचा शोध लावला. त्यांचं नास्तिक असणं राजना डाचतंय.
भोंगा की लाउडस्पीकर........ ?
आक्रमकपणे मांडलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे लवकर येतच नव्हते. पब्लिकमधून कुणीतरी आवाज काढला...' भोंगा'. येतो त्या मुद्द्यावर असं राज यांना म्हणावं लागलं. सभेत राज यांनी भोंगा हा शब्द न वापरता लाउडस्पीकर हा शब्द वारंवार वापरला. हा बदल सहज लक्षात आला. पवार यांच्यावरील टीकेपेक्षा लोकांना भोंग्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता. ते ऐकण्यासाठीच लोक सभेला आलेले होते. मग राज यांनी पवार यांना टार्गेट करायचं आणि एरव्ही खुलासे करण्याच्या भानगडीत न पडणारे पवार यांनी खुलासे करायचे, हे राजकारण अद्याप तरी महाराष्ट्रासाठी गूढच आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांशी तुलना.....
या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी होत आहे. बाळासाहेबांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभाच शिवसेना मराठवाड्यात रुजण्यास कारणीभूत ठरल्या. बाळासाहेबांच्या सभांमध्ये आसनव्यवस्था नसायची. लोक उभे राहूनच सभा ऐकायचे. ‘राज’सभेत आसनव्यवस्था होती. तरीही बाहेर झालेली गर्दीही नक्कीच दखल घेण्यासारखी होती. तरुणाईचा उत्साह, जोष, जल्लोषही दिसला. शिवसेनेसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. राज यांच्या सभेतली गर्दी स्थानिक किती, बाहेरची किती हाही चर्चेचा विषय ठरू शकतो.
खैरे - दानवे यांच्यावर टीकास्त्र
राज ठाकरे यांच्या आधीच्या वक्त्यांनी चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांना टार्गेट केले होते. सुमित खांबेकर, दिलीप धोत्रे यांनी खैरेंवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला खैरे- दानवे कसे उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ही सभा औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचे शिवसेनेचे गणित बिघडवू शकते का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.