एकाच महिन्यात दोनदा दुकान फोडले; लाखोंचे ग्रीस, ऑटोमोबाईल साहित्य लुटणारे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 14:48 IST2024-03-23T14:47:36+5:302024-03-23T14:48:14+5:30
दोघा आरोपींना केले मालेगाव येथून अटक; स्थानिक गुन्हे शाखा व अजिंठा पोलिसांची कामगिरी

एकाच महिन्यात दोनदा दुकान फोडले; लाखोंचे ग्रीस, ऑटोमोबाईल साहित्य लुटणारे दोघे अटकेत
सिल्लोड : तालुक्यातील शिवना येथे ऑटोमोबाईलचे दुकान दोन वेळा फोडून लाखो रुपयांचे साहित्य चोरणाऱ्या मालेगाव येथील दोघा कुख्यात चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा व अजिंठा पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. आसिफ इकबाल शेख अहेमद ( ३०, रा.पालेशेड कंपाऊंड मालेगाव जि.नाशिक) आणि मुज्जसिर अहेमद जमीर अहेमद (२८, रा. नुरबाग मालेगाव ) अशी आरोपींची नावे आहेत.
शिवना येथील शेख अजहर शेख सलीम यांचे अजिंठा ते बुलढाणा महामार्गावर ऑटोमोबाईल शॉप आहे. येथे एकाच महिन्यात दोन वेळा चोरी झाली होती. यात ऑईल, शॉकअप आदी लाखो रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, गुन्हे शाखेचे पोनी सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव, पोहेकॉ कासम शेख, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, रवींद्र खंदारे, योगेश तरमुळे, संतोष तांदळे, अजिंठा पोलिस ठाण्याचे सपोनी अमोल ढाकणे, उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, अरुण गाडेकर या पथकाने तपासानंतर मालेगाव गाठले. येथून पोलिस पथकाने आसिफ इकबाल शेख अहेमद आणि मुज्जसिर अहेमद जमीर अहेमद या दोघांना जेरंबद केले. आरोपींकडून शॉपमधून चोरीला गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शेंद्रा येथील लाखोंची ग्रीस चोरीही उघड...
कुंभेफळ शेंद्रा येथील रमेश भगत यांचे शेंद्रा परिसरात असलेले ग्रीसच्या दुकानातून महिन्याभरापूर्वी ६ लाख ६१ हजार रुपये किमतीचे ग्रीस चोरी झाले होती. याच चोरट्याच्या ताब्यातून पथकाने चोरीचा मुद्देमाल जप्त केला. अशा दोन चोऱ्या पोलिसांनी उघड केल्या.